
मुंबई, (निसार अली) : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कोकणातील विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी सतत आग्रही असलेले प्रा. गोपाळ दुखंडे यांचे आज सावंतवाडी येथे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने समाजवादी चळवळीचा चेहरा हरपला, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
दुखंडे यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, कन्या सोनाली, मुले संतोष, संदीप असा परिवार आहे.
काही वर्षा पूर्वी ते सावंतवाडीत स्थायिक झाले होते.या वयात ही ते सिंधुदुर्गात होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमात हजेरी लावत असत.मुंबई असताना अरविंद सावला त्यांची काळजी घेत असे.
त्यांचे पार्थिव आज रात्री मुंबईत आणले जाईल आणि उद्या बुधवारी संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या ११/१०१, सिद्धार्थ नगर नंबर ५, प्रबोधन क्रीडा भवन समोर, गोरेगाव (प) मुंबई येथील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा निघेल.
अल्पपरिचय
वडील गिरणी कामगार. लहानपणापासून संघर्ष करीत दुखंडे सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गोरेगावहून सकाळी भिवंडी येथील एका महाविद्यालयात ते अध्यापन करण्यासाठी जात असत. तिथून सुटल्या नंतर जनता दल, छात्रभारती आणि इतर सामाजिक, राजकीय कामासाठी वेळ देत असत. युक्रांद या युवक चळवळीमधून त्यांनी कामाला सुरुवात केली होती.
कोकणचा विकास हाच ध्यास
कोकणावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजार पेठ भरविली होती. कोकण रेल्वे येण्याकरीता झालेल्या प्रत्येक आंदोलनात दुखंडे सरांचा सहभागी होत असत. कोकणातील मुलाला कोकण रेल्वे मध्ये नोकरी मिळावी म्हणून अभिजीत हेगशेटये,युयुत्स्य आर्ते या छात्र भारतीच्या मुलांना घेऊन त्यांनी “कोकण रेल्वे जनाधिकार समिती”ची स्थापना केली होती. प्रा.मधू दंडवते यांचे ते निकटचे सहकारी होते. मालवण विधान सभा मतदार संघातून त्यांनी १९९५ साली नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.
मुंबई विद्यापीठातही उठवीला कामाचा ठसा
मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य होते. विद्यापीठाचा कारभार मराठीत सुरू व्हावा, याचा ते प्रत्येक सभेत आग्रह धरीत. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले.
मुंबईतील विद्यार्थी, कामगार आदी चळवळींमध्ये महत्वाचा सहभाग
छात्रभारती च्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्या पासून लक्ष घातले होते.कपिल पाटील,शरद कदम या त्यावेळच्या विद्यार्थी नेत्याना हाताशी धरून त्यांनी अनेक आंदोलने उभी केली. रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा छात्र भारतीने काढलेला रात्रीचा पहिला बॅटरी मोर्चा, त्यावेळचे महापालिका उपायुक्त गो. रा.खैरनार यांना घेऊन रुईया कॉलेजच्या नाक्यावर कुलगुरू डॉ.कर्णिक यांच्या विरोधात केलेले आंदोलन, गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेला चड्डी,बनियान मोर्चा, भारतमाता सिनेमा वाचविण्यासाठी झालेले आंदोलन, नामांतर लढा, मंडल आयोग स्थापन करण्या साठी झालेल्या प्रत्येक लढाईत प्रा.दुखंडे सर पुढे असत. जनता दलाचे ते काही काळ प्रदेश सेक्रेटरी होते.
“प्रा.गोपाळ दुखंडे सरांनी कार्यकर्ते आणि या चळवळी साठी खूप करून ठेवले आहे. समाजातील प्रश्नांबाबत सतत अस्वस्थ असणारा तळमळीचा समाजवादी नेता आपल्यातून निघून गेला आहे.त्यांच्या जाण्याने व्यक्तिशः माझी आणि पुरोगामी चळवळीची खूप हानी झाली आहे.”
-शरद कदम,कार्याध्यक्ष,राष्ट्र सेवा दल, मुंबई















