मुंबई : मुंबईतील ज्या खाजगी शाळा आहेत. त्यांनी केलेल्या भरमसाठ आणि मनमानी फीवाढीमुळे या शाळेतील मुलांचा पालकवर्ग अतिशय त्रस्त झाला आहे. या शाळा पालकांवर वाढीव फी भरण्याबाबत दबाव टाकत आहेत. या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली पालकवर्गाचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले.
संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये फीवाढीच्या बद्दल जो कायदा आहे, त्या कायद्याच्या विरोधात जाऊन खाजगी शाळा दरवर्षी अवास्तव फीवाढ करत आहेत. प्रत्येक वर्षी या शाळा फीवाढ करू शकत नाहीत असा कायदा आहे. तरीही ही फीवाढ केली जाते आणि १५% पेक्षा जास्त केली जाते. जे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे. ही फी वाढ परत घेतली पाहिजे. यासाठी राज्यपालांनी शासनावर दबाव टाकावा आणि त्यांच्याशी बोलावे, कारण महाराष्ट्र सरकारमध्ये जे लोक बसले आहेत. ते पूर्णपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत.
दोन दिवसांत सर्व अधिकारी वर्गाला बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे राज्यपालांनी सांगितल्याचे निरुपम म्हणाले.
दहिसर येथील युनिव्हर्सल हाय स्कूलच्या पालकवर्गाच्या शिष्टमंडळातून साक्षी डहाणूकर, सुमन शेट्टी, गुरुनाथ पाटकर, निरव शाह, रुपाली शानभाग, प्रशांत जोशी, नेहा पटेल, पूजा परमार, स्नेहल पटेल व इतर पालक उपस्थित होते.