नवी दिल्ली, 27 मार्च 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्याच्या आजच्या दुसर्या दिवशी ओरकंडीच्या हरि मंदिरात पूजा-अर्चा केली आणि आदरणीय ठाकूर कुटुंबाच्या वंशजांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी ओरकंडी येथे मातुआ समाजाच्या प्रतिनिधींना संबोधित केले, इथूनच श्री श्री हरि चंद ठाकूरजींनी सामाजिक सुधारणांचा पवित्र संदेश प्रसारित केला होता. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना आपल्या विकास आणि प्रगतीतून संपूर्ण जगाची प्रगती पहायची आहे. जगात अस्थिरता, दहशतवाद आणि अशांततेऐवजी स्थैर्य, प्रेम आणि शांतता दोन्ही देशांना हवी आहे. तीच मूल्ये आपल्याला श्री श्री हरिचंद ठाकूरजी यांनी दिली होती.
पंतप्रधान म्हणाले की, आज भारत ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या मंत्राने पुढे वाटचाल करत आहे आणि त्यामध्ये बांगलादेश ‘शोहोजत्री’ आहे. त्याचबरोबर, बांगलादेश जगासमोर विकास आणि परिवर्तनाचे भक्कम उदाहरण सादर करत आहे आणि या प्रयत्नांमध्ये भारत बांगलादेशचा ‘शोहोजत्री ‘ आहे.
पंतप्रधानांनी ओरकंडी येथे मुलींसाठी विद्यमान माध्यमिक शाळेचा दर्जा उंचावणे तसेच प्राथमिक शाळा सुरू करण्यासह अनेक घोषणा केल्या. श्री श्री हरिचंद ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त ‘बरुनिस्नान’ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतातून दरवर्षी मोठ्या संख्येने लोक ओरकंडी येथे येतात. त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणखी प्रयत्न केले जातील, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.