नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपुरातील संविधान सन्मान संमेलन या कार्यक्रमात प्रसार माध्यमांवर बंदी घालण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माध्यम स्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्या काँग्रेसकडूनच माध्यमांवर बंदी आल्याने टीकेची झोड उठली आहे. नागपुरातील रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात ६ नोव्हेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, आणि नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मात्र, माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे.
काँग्रेसविरोधकांनी या घटनेवरून काँग्रेसवर संविधानाच्या नावाखाली वेगळा अजेंडा राबवत असल्याचा आरोप केला आहे. संविधान सन्मान संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे करण्यात आले असून, प्रमुख वक्ते म्हणून राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, कार्यक्रमात संविधानाच्या सन्मानावर राहुल गांधी मार्गदर्शन करतील. मात्र, कार्यक्रमात माध्यमांना प्रवेश नाकारल्यामुळे विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की, काँग्रेसकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हक्क सांगूनही प्रत्यक्षात तेच मुल्यांचा अपमान करत आहेत का?
या मुद्द्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे की, संविधानाच्या नावाखाली काँग्रेसने अनेकदा चुकीचे पाऊल उचलले आहे. भाजप प्रवक्त्यांनी असा आरोप केला की, काँग्रेस पक्षाने पूर्वी संविधानात केलेले बदल आणि आताचे कृतीमुळे त्यांच्या संविधानातील मूल्यांवर असलेला दावा फोल ठरत आहे.
काँग्रेसकडून मात्र हा आरोप फेटाळण्यात आला असून, हा कार्यक्रम ओबीसी युवा अधिकार मंचचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माध्यमांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय काँग्रेसचा नसून मंचाच्या व्यवस्थापकांनी घेतलेला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलन या कार्यक्रमात माध्यमांना मज्जाव केल्यामुळे हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.