मुंबई, दि. 15 : फणस फळपिकाचे उत्पादन लागवडीखालील क्षेत्र वाढावे यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा. फणसाच्या विविध जातीची दर्जेदार कलमे तयार करणे, रोपवाटिका उभारणे तसेच फणस फळपिकाविषयी संशोधन करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत निर्देश दिले.
फणस फळपीक संशोधन विकास केंद्र स्थापन करण्याबाबत मंत्रालय येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, फलोत्पादन संचालक डॉ.के.पी.मोते, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे डॉ. पराग हळदणकर, जॅकफ्रुट ॲग्रो प्रोड्युसर कंपनी झापडे ता.लांजा येथील मिथिलेश देसाई उपस्थित होते.
कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, फणस हे नगदी फळपीक म्हणून शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे फणसाच्या राज्यातील व देशातील जाती पाहून राज्यात कोणत्या जाती फायदेशीर ठरू शकतात याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. फणस लागवडी योग्य क्षेत्र कोणते आहे याची पाहणी करून त्याचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. या फळपिकाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे. फ्रुट ॲग्रो प्रोड्युसर कंपन्या कोणकोणती उत्पादने घेतात त्या अनुषंगाने शासन काय करू शकते याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच विद्यापीठाने त्यांच्याकडे फणस फळपीकाबाबत अभ्यास तसेच अनुषंगिक बाबींकरिता शासनाकडे सुधारित प्रस्ताव सादर करावा. याबाबत राज्य शासन नक्कीच तरतूद वाढवून या फळपिकाच्या विकासासाठी ठोस निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.