रत्नागिरी, (आरकेजी) : प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प कोकणातून हद्दपार व्हावा असं साकडं आज प्रकल्पग्रस्तानी विठूरायाला घातलं. यासाठी सागवे- कात्रादेवी इथून आंबेरी विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. जवळपास 500 हून अधिक प्रकल्पग्रस्त या दिंडीत सहभागी झाले होते.
कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रणकंदन माजलं आहे. नागपूर येथील अधिवेशनातही याचे जोरदार पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यानी विधानसभेत केलेल्या विधानावरूनही प्रकल्पग्रस्त आणखी आक्रमक झाले आहेत. यावरून मुख्यमंत्र्यांचा मुंबईत तसेच नाणार परिसरात निषेध करण्यात आला. हा विरोध आता आणखी तीव्र होऊ लागला आहे. हा प्रस्तावित प्रकल्प कोकणातून हद्दपार व्हावा यासाठी विठूरायाला आज साकडं घालण्यात आलं. मुंबईतही दिंडी काढण्यात आली. तर नाणार परिसरातही दिंडी काढून विठूरायाला साकडं घालण्यात आलं. भूमीकन्या एकता मंच आणि नागरी हक्क संवर्धन समिती यांच्या वतीने या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 2 वाजता सागवे- कात्रादेवी येथून या दिंडीला सुरुवात झाली. आंबेरी विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढून विठू रायाला साकडं घालण्यात आलं. विठू रायाचे दर्शन घडवूया कोकणातून नाणार रिफायनरी हद्दपार करूया, या विऩाशकरी प्रकल्पाला कोकणापासून वाचव असं साकडं विठ्ठलाला घालण्यात आलं.