मुंबई – एल अँड टी चा उपक्रम प्रयास ट्रस्ट, मुंबईने शहापूर जिल्ह्यातील १० आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले आहे. या विशेष कार्यक्रमाचा उद्देश या जोडप्यांना आनंददायी आणि संस्मरणीय विवाह अनुभव मिळवून देणे तसेच पारंपरिक विवाहांशी निगडित आर्थिक ओझ्यातून मुक्त करणे हा आहे.
कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी विवाह समारंभ मोठा आर्थिक ताण निर्माण करतो. या वास्तवाच्या जाणिवेतून या उपक्रमाची कल्पना समोर आली आहे. या कुटुंबांना पारंपरिक विवाह समारंभ साजरे करण्यासाठी आर्थिक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. समाजातील अशा कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने प्रयास ट्रस्टने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचा उद्देश या कुटुंबांना आनंद देणे आणि समाजामध्ये परवडणारे, किफायतशीर आणि सामुदायिक पाठबळावर आधारित विवाहांना प्रोत्साहन देणे आहे.
विवाह सोहळ्याचा भाग म्हणून प्रयास ट्रस्ट या जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक गृहपयोगी वस्तू पुरवेल. तसेच, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जोडप्यांच्या ५०० नातेवाईकांसाठी भोजनाची व्यवस्थाही केली जाईल. हा कार्यक्रम पूर्णतः प्रयास ट्रस्ट, मुंबईद्वारे आयोजित केला गेला असून त्यामध्ये कोणत्याही बाह्य स्वयंसेवी संस्थांचा सहभाग नाही.