रत्नागिरी (आरकेजी): मुसळधार पावसात पर्यटकांची पाऊले आपसूकच धबधबे, तलाव व धारणांकडे वळतात. परंतु अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेकदा येथे दुर्घटना घडतात. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी ३१ जुलै पर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
जिल्ह्यात पावसाने सध्या जोर धरला आहे. त्यामुळे दऱ्या- खोऱ्यातून वाहणारे धबधबे, नद्या, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्याठिकाणी पाण्यात उतरणे, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्याचे 100 मीटर परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे इत्यादी कृत्ये करतात. परिणामी दुर्घटना होतात. जिवीतहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या असून अशा ठिकाणी भविष्यात जिवीतहानी होवू नये म्हणून जिल्ह्यातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात अशा ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील उक्षी, निवळी, रानपाट, पानवल, संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर, राजापूर तालुक्यातील सवतकडा, धूतपापेश्वर, चिपळूण तालुक्यातील सतवसडा या धबधब्यांच्या ठिकाणी तसेच तलाव आणि धरणांच्या बाबतीत 100 मीटर परिसरात 31 जुलै 2018 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.