नवी दिल्ली : देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी आजपासून पदभार स्वीकारला. मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. संसदेच्या मध्य सभागृहा शपथविधी सोहळा पार पडला.
आपल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, राष्ट्रपती म्हणून मला तुम्ही जी जबाबदारी दिली आहे त्यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. मी पूर्ण विनम्रतेने हे पद स्वीकारतो आहे. या मध्यवर्ती सभागृहात आल्यावर माझ्या अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी संसदेचा सदस्य होतो, आणि त्यावेळी तुमच्यापैकी अनेक लोकांसोबत मी अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली आहे. खूपदा आपण अनेक मुद्द्यांवर सहमत व्हायचो, तर कित्येकदा असहमत व्हायचो. मात्र असे असले तरी आपण एकमेकांच्या विचारांचा सन्मान करायला शिकलो आणि हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे.
मी एका छोट्याशा गावात साध्या मातीच्या घरात वाढलो आहे. माझा हा प्रवास खूप मोठा आहे. मात्र हा प्रवास माझ्या एकट्याचा नाही, आपला देश आणि समाजाचीही हीच गाथा आहे. अनेक आव्हानांनंतरही आपल्या देशात, संविधानाच्या प्रस्तावात उल्लेख केलेल्या –न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांचे पालन केले जाते. आणि मीही या मूलमंत्राचे सदैव पालन करत आलो आहे, असेही ते म्हणाले.
या महान राष्ट्रातील १२५ कोटी नागरिकांना मी वंदन करतो, आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला आहे, तो मी सार्थ करुन दाखवेन असे मी वचन देतो. मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की मी डॉक्टर राजेन्द्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माझ्या आधीचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्यांना आपण सगळे प्रेमाने ‘प्रणबदा’ म्हणतो, त्यांच्यासारख्या महान नेत्यांच्या पाउलखुणावर वाटचाल करतो आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा अल्पपरिचय
वकील, प्रसिद्ध राजकीय प्रतिनिधी आणि दीर्घकालीन साम्यवादी वकील तसेच भारतीय सार्वजनिक जीवन व समाजातील एक सच्चे व्यक्तीमत्व रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील पारारुंख येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मैकू लाल तर आईचे नाव कलावती.25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारण्याआधी ते 16 ऑगस्ट 2015 ते 20 जून 2017 या कालावधीत बिहारचे 36 वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी :
कोविंद यांनी आपले शालेय शिक्षण कानपूर येथून पूर्ण केले. ते कानपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी आणि एल.एल.बी उत्तीर्ण झाले. 1971 मध्ये ते दिल्लीच्या बार काऊंसिलमध्ये वकील म्हणून नियुक्त झाले.कोविंद 1977 ते 1979 या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. तर 1980 ते 1993 या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे स्थायी सल्लागार म्हणून कार्यरत होते. 1993 पर्यंत 16 वर्ष त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.
संसदीय आणि सार्वजनिक जीवन:
कोविंद 1994 रोजी उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले. कोविंद यांनी अनुसूचित जाती/जमातींच्या कल्याणासाठीची संसदीय समिती, गृह व्यवहारासंदर्भातील संसदीय समिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समिती, सामाजिक न्याय आणि सबलीकरण संसदीय समिती आणि कायदा आणि सुव्यवस्था संसदीय समितीसारख्या विविध संसदीय समित्यांमध्ये कार्य केले.कोविंद डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ, लखनऊचे व्यवस्थापकीय मंडळ तसेच भारतीय व्यवस्थापन संस्था, कोलकाताच्या नियमित मंडळाचे सदस्य म्हणून देखील कार्यरत होते. अमेरिकेत गेलेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे देखील ते सदस्य होते तसेच त्यांनी ऑक्टोबर 2002 मध्ये अमेरिकेच्या संसदेला संबोधित केले होते.
पदभार :
2015-17 : बिहारचे राज्यपाल 1994-2006 : राज्यसभा सदस्य, उत्तर प्रदेशचे प्रतिनिधी1971-75 आणि 1981 : अखिल भारतीय कोळी समाज, महासचिव1977-79 : दिल्ली उच्च न्यायालयात सरकारी वकील1982-84 : सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे कनिष्ठ सल्लागार वैयक्तिक माहितीरामनाथ कोविंद यांनी सविता यांच्यासोबत 30 मे 1974 रोजी विवाह केला. त्यांना प्रशांत कुमार आणि स्वाती ही दोन अपत्ये आहेत. कोविंद यांना वाचनाचा छंद असून ते राजकीय आणि सामाजिक परिवर्तन, कायदा आणि इतिहास आणि धर्मावरील पुस्तकांचे वाचन करतात.त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात कोविंद यांनी देशभरात प्रवास केला आहे. त्यांनी थायलंड, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेचा दौरा देखील केला आ