मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाची जबाबदारी
प्रशांत यादव यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
चिपळूण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वाणिज्य व उद्योग विभागाच्या मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय महासचिव पदावर चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वाणिज्य व उद्योग विभागाच्या मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मा. जनक व्यास यांनी मा. यादव यांना याबाबतचे नियुक्ती पत्र दिले आहे. या निवडीबद्दल मा. यादव यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वाणिज्य व उद्योग विभागाच्या मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मा. जनक व्यास यांनी याबाबत मा. यादव यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी, मा. राहुलजी गांधी, मा. प्रियंकाजी गांधी, तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी वाणिज्य व उद्योग विभाग अध्यक्ष यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाई पटोले साहेब यांच्या आदेशाने पक्ष संघटनेतील आपले उल्लेखनीय कार्य पाहता आपली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वाणिज्य व उद्योग विभागाच्या मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
मा. यादव यांच्या निवडीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाई पटोले साहेब यांच्यासह वाणिज्य व उद्योग विभागाच्या मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मा. जनक व्यास, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष मा. अनिल बापू पाटील, उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई पाटील आदींनी मा. यादव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराचे जाळे वाढवून तसेच पर्यावरण पूरक उद्योग-व्यवसायांना उभारी देऊन वाणिज्य व उद्योग क्षेत्राचा विकास करण्याचे ध्येय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वाणिज्य व उद्योग विभागाचे आहे. यासोबतच 2024 मधील निवडणुकांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन या विभागाच्या माध्यमातून काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याचे ध्येय या विभागाचे असेल. या विभागाच्या महासचिवपदी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. यादव यांची निवड होणे अभिमानास्पद आहे, अशी भावना काँग्रेसमधील आजी-माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मा. यादव यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पर्यावरणपूरक व्यवसायावर भर देणार : प्रशांत यादव
पक्षाने फार मोठी जबाबदारी दिली आहे. या सेलमध्ये काम करायला संधी दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचे खूप खूप आभार. या सेलच्या माध्यमातून कोकणात पर्यावरणपूरक व्यवसाय आणण्याच्या दृष्टीने भर दिला जाईल आणि इथल्या उद्योगधंद्यांना काँग्रेस पक्षाच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात शासनाची मदत मिळवून देण्याच्या संदर्भात काम करण्याचा मानस आहे. तालुकाध्यक्ष पदावर काम करताना पक्षसंघटनना वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. नव्या जबाबदारीमुळे या पक्षवाढीच्या कामातही अधिक बळ मिळेल. अर्थातच आतापर्यंत काम करताना ज्या पद्धतीने नव्या-जुन्या, ज्येष्ठ आजी-माजी पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची साथ मिळाली, तशीच साथ यापुढेही राहील, असा विश्वास चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.















