मुंबई : महापालिका प्रभाग क्रमांक ११६ च्या भांडुप येथील काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृद्याच्या तीव्र झटक्याने आज मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. संध्याकाळी विभागातील कामांचा आढावा घेऊन त्या घरी परतल्या आणि अचानक त्यांना हृद्याचा झटका आला. ताबडतोब मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांच्या त्या पत्नी तर दिना बामा पाटील यांच्या स्नुषा होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले असा परिवार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११६ मधून ८३२६ मते मिळवून त्या पहिल्यादाच निवडून आल्या होत्या. पाटील यांनी तीन महिन्यातच कामाची धडाकेबाज सुरुवात करुन चार कोटींची जकात चोरी पकडून दिली होती.
त्यांच्या निधनामुळे भांडुप परिसरावर शोककळा पसरली आहे. व्यापार्यांनी विभागातील दुकाने बंद ठेवली. भांडुपमध्ये ठिकठिकाणी फ्लेक्स लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादीमधून त्या काँग्रेस पक्षात दाखल झाल्या होत्या आणि काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडूनदेखील आल्या होत्या. भांडुप येथील हिंदू स्मशानभूमीत उद्या बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.