मुंबई : सृजन नागरिक होण्यासाठी अवांतर व सखोल वाचन करून त्यातून आदर्श विचार आत्मसात करावे. समाजात कोणीही परिपूर्ण नसते, तरीही आपण सर्वतोपरी परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करावा. आयुष्यात प्रामाणिक राहून व कठीण परिस्थिती वर मात करून पुढे वाटचाल करत रहा. आयुष्यात निव्वळ तिजोरीतील सोनं मिळवण्यासाठी प्रयत्न करू नका तर त्यापेक्षा आपल्या आयुष्याचं सोनं करा, हा जगण्याचा मूलमंत्र मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ सभापती मधु चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थींनीना दिला.
ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या अस्मिता महाविद्यालयात दिनांक १४ ऑगस्ट, २०१९ रोजी मधु चव्हाण यांचा जाहीर सत्कार व संवाद समारोह आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मधुकर नार्वेकर, अस्मिता वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा प्रणील नायर, अस्मिता विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. गोरगे व ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे विश्वासू, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच उत्कर्ष बाल मंदिर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या एन सी सी क्याडेट ने संचालन करून मधु चव्हाण यांचे जोरदार स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात मधु चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष मधुकर नार्वेकर, अस्मिता वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा प्रणील नायर व अस्मिता विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. गोरगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. तसेच विठ्ठल उमप यांनी लिहिलेल्या ‘विद्देचा कुंभ’ या गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी मधुकर नार्वेकर यांनी फेटा, शाल, श्रीफळ व संस्थेचे सन्मानचिन्ह देऊन चव्हाण यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक प्रा. अरुणा वेलणकर यांनी मधु चव्हाण यांचा परिचय करून दिला.
यानंतर अतिथी चव्हाण यांनी अस्मिता महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी व विद्यार्थांशी थेट संवाद साधला. आपल्या भारत देशाची प्रगतीकडे होणारी वाटचाल, भारताची भव्य संस्कृती व ग्रंथसंपदा, तसेच प्रवाहाबरोबर भारतात होणारे सामाजिक परिवर्तन व त्यासाठी आपल्या देशाला युवा पिढीकडून सृजन नागरिक प्राप्त होण्याची असलेली गरज या विषयावर त्यांनी आपले मनोगत मांडले.
वरिष्ठ महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. नेहा दळवी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.