मुंबई : कोणत्याही नेत्यास सामाजिक चेहरा आवश्यक असतो. त्याला वैचारिक बैठक असणे गरजेचे आहे. जर तशी वैचारिक बैठक नसेल तर त्या नेत्याच्या नेतृत्वाखालील घटक रसातळाला जातो असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या नेतृत्वशास्त्र विभागाने घेतलेल्या ‘राजकीय नेतृत्व’ या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आंबेडकर यांनी गुंफले. कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या आवारातील संस्कृत भवन येथे त्यांचे व्याख्यान झाले.
तळागाळातील नेतृत्व कसे विकसित होते. त्यासाठी चळवळ कशी पोषक ठरते. नेता होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते याविषयी त्यांनी माहिती दिली. नेतृत्व आक्रमक असावं पण अहंकारी नसावे, असेही ते म्हणाले. राज्यघटना आणि आरक्षण याविषयी देखील त्यांनी मते मांडली. कामगार, सहकार, विद्यार्थी, दलित आदी चळवळींची माहिती त्यांनी दिली. पूर्वीच्या काळी चळवळ हा नेतृत्वाचा झरा असायचा. चळवळीतूनच नेतृत्व पुढे यायचं. आता हा झरा आटत चालला आहे, त्यामुळे सकस नेतृत्व समाजाला मिळत नाही याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली.
“ प्रकाश आंबेडकरांसारख्या विद्वान नेत्याने विद्यार्थ्यांना आज जे मौलिक मार्गदर्शन केले ते निश्चितच शब्दातीत आहे. तळागाळातील नेतृत्वासोबतच वैचारिक आणि नैतिक नेतृत्व कसे असावे याचे धडे आज विद्यार्थ्यांना मिळाले,” अशा शब्दांत नेतृत्वशास्त्र विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले.