डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका गठीत करणे, कल्याण ग्रोथ सेंटर मधील भूमिपुत्रांना बांधकाम परवानगी देणे, २७ गावातील दस्त नोंदणे सुरू करणे, कल्याण-शीळ रस्ता बाधितांना मोबदला देणे, नेवाळी शेतकरी आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे, भाल गावातील वेगवेगळे आरक्षण हटवणे, आयरे गावातील जमीन प्रकरण, ठाण्यातून क्लस्टर हटवणे, मुंब्रा येथील रेती व्यवसायिकांचे प्रश्न, मुंबईसह सातही सागरी जिल्ह्यातील गावठाण कोळीवाड्यांचे सिमांकन यासह स्थानिक पातळीवरील विविध समस्या सोडवा अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन ठाणे जिल्ह्यातील अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांनी केली.
आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे सल्लागार संतोष केणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांनी मुंबई तन्ना हाऊस येथे कॉग्रेस प्रदेश कार्यालयात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली. मागील साडेचार वर्षांपासुन स्थानिक भूमिपुत्रांवर शासनाने कशा प्रकारे अन्याय केले याचा पाढा यावेळी अन्यायग्रस्त भूमिपुत्रांकडून वाचण्यात आला. यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले, स्थानिक पातळीवरील शेतकरी बांधवांसमोर निर्माण झालेल्या समस्या ह्या मागील साडे चार वर्षापासून असून हे सरकार बिल्डर धार्जिणे आहे. यांना स्थानिकांच्या विचारांशी देणंघेणं नाही. यांनी शेतकरी भूमिपुत्रांचे अस्तित्व नाहीसे करण्याचे ठरवले आहे. आपण केलेल्या सुचना शासनापर्यंत पोचवल्या जातीलच परंतु सत्तेत जेव्हा आम्ही असू तेव्हा या सर्व अडचणी सुटलेल्या असतील. ठाणे जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार आणि आघाडीचा खासदार असला पाहिजे, जो तुमची बाजू मांडेल. राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता येतील. त्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून या भाजप सरकारला दाखवून द्या. तुमचा आवाज उचलणारा लोकप्रतिनिधी असायला हवा.
आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे सल्लागार संतोष केणे म्हणाले, भाजप सरकार जनतेची फसवणूक करत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद निर्माण करून करण्याच्या प्रयत्न करत आहेत. यावेळी आमदार भाई जगताप, पुथ्वीराज साठे, संतोष केणे, गजानन पाटील, गिरीश साळगावकर, सुरेन कोळी, पुंडलीक वाडेकर, अनिल भगत, गजानन म्हात्रे उपस्थित होते.