रत्नागिरी : महिलांसाठीचे कायदे आणि त्यांचा सुयोग्य वापर याचे ज्ञान प्रज्ज्वलाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि बचत गटांमधून 5 हजार महिलांचे अर्थिक सक्षमीकरण देखील होणार आहे. याचा बचत गटातील महिलांनी संधी म्हणून वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले.
येथील वि. दा. सावरकर सभागृहात प्रज्ज्वला अंतर्गत महिला उद्योजक प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील कार्यशाळेचे उद्घाटन आज झाले याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ज्वलाच्या अध्यक्षा दिपाली मोकाशी, सदस्य साळवी, मिनल मोहाडीकर,जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जि.प. सदस्य सुभाष बने, पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, माजी अध्यक्षा रश्मी कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. बामणे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महिला आयोगाच्या वतीने बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तीन टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे अशी माहिती प्रज्ज्वलाच्या अध्यक्षा दिपाली मोकाशी यांनी दिली. पहिल्या टप्प्यासाठी नुकतीच राज्य अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.या संदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महिलांनी यात सहभागी व्हावे अशी एक ध्वनीचित्रफित कार्यशाळेत दाखविण्यात आली.
महिला व बचत गट चांगल्या पध्दतीने व्यवसाय,उद्योग करण्याची क्षमता ठेवूनआहेत.मात्र हे गट काही काळानंतर बंद पडतात. याबाबत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या समवेत बैठक झाली होती. हे बचतगट बाजारापेठ उपलब्ध नसल्याने बंद पडतात त्यामुळे बचतगटांना सर्वच बाबतीत मदत करण्याच्या भूमिकेतून ग्रामविकास विभाग महिला आयोगाच माध्यमातून प्रज्ज्वला योजना घेऊन आले आहे अशी माहिती अध्यक्षा दिपाली मोकाशी यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात राज्यात बचत गटांचे कार्यशाळा घेण्यात येत आहेत. यात रविवार 23 जुन रोजी सिंधुदुर्गातील कणकवली येथे कार्यशाळा झाली. आज याअंतर्गत रत्नागिरी व गुहागर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.
दुसऱ्या टप्प्यात उद्योग उभारण्यासाठी त्या त्या जिल्हयात असणारी वैशिष्टये लक्षात घेऊन क्लस्टर निर्माणकरुन उद्योगाबाबत प्रशिक्षण आणि त्यासाठी आवश्यक असणारे कायद्याचे ज्ञान देण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष विक्रीसाठी बाजारपेठ उभारणी केली जाईल. यात बदलत्या युगानुसार ही उत्पादने ऑनलाईन पध्दतीने विकणे असे सहाय्य या योजनेत बचतगटांना दिले जाणार आहे असे मोकाशी म्हणाल्या. जिल्हा परिषद व नगरपालिका यांनी जागा उपलब्ध करुन दिल्यास कायमस्वरुपी विक्री केंद्र देखील देण्याची योजना आहे यासाठी 50 लाखांपर्यंत भांडवल दिले जाईल असे त्या म्हणाल्या.
सर्व प्रकारचे कायदे सर्वांना माहिती असणे शक्यच नाही मात्र एकमेकांशी चर्चा करुन त्याची माहिती घेतली आणि कामाची जिद्द ठेवली तर वाटचाल सोपी होवू शकते असे आचंल गोयल यांनी आपलया भाषणात सांगितले. स्त्री – पुरुष समानता प्रत्यक्षात समाज घटकात मान्य झाली असली तरी स्त्रियांना यशस्वी होण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते असेही त्या म्हणाल्या.
कायद्याचे ज्ञान मिळवल्यावर त्याचा योग्य वापर महत्वाचा ठरतो.याचा गैरवापर होणार नाही याचीही खबरदारी महिलांनी घ्यावी असे त्या म्हणाल्या.
आरंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सायबर क्राईम याविषयावर मार्गदर्शन केले.