मुंबई – विरोधकांना न जुमानता नागरीविकास कामांचे प्रस्ताव रेटून नेणारी सत्ताधारी शिवसेना वर्षाच्या प्रगती अहवालात मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर कॉंग्रेस आघाडीवर असून भाजपला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. प्रजा फाऊंडेशनने महापालिकेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांच्या पहिल्या वर्षाच्या कामगिरीचा प्रगती अहवाल शुक्रवारी प्रेस क्लबमध्ये प्रसिध्द केला.
महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसने ३१ नगरसेवकांच्या बळावर दमदार कामगिरी केली आहे. तर सत्ताधारी शिवसेना तिसऱ्या व भाजपला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. चकाचक रस्ते, खड्डे, आरोग्य, शिक्षण, पाणाीपुरवठा अशा विविध समस्यांनी मुंबईकर त्रस्त आहेत. करदात्या मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात मांडून ते सोडवले जातील, असा विश्वास मुंबईकर नगरसेवकांवर ठेवतात. मात्र सभागृहात प्रश्न विचारणाऱ्यांपैकी १३ नगरसेवकांनी २०१७-१८ या वर्षात एकही प्रश्न विचारलेला नाही. या माैनी नगरसेवकांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही घेणदेणं नसल्याचा आरोप प्रजा फाउंडेशनने केला आहे. नगरसेवकांना मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्याएेवजी रस्ते नामकरणात रस असल्याचे प्रजाने अहवालात म्हटले आहे.तब्बल ३२० रस्त्यांच्या नामांकरणाच्या आहेत. तसेच २२७ नगरसेवकांपैकी ३७ नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहेत. नगरसेवकांनी केलेल्या कामगिरीत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर (८१.५९) पहिल्या क्रमांकावर तर कॉंग्रेसच्या श्वेता कोरगावकर (७९.२२) दुसऱ्या आणि भाजपच्या प्रीती सातम (७९.१२) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. निवडून आल्यानंतर नवीन नगरसेवकांच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेणारे हे पहिले प्रगती पुस्तक आहे.















