मुंबई : माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या ‘उडान – ए ग्राफीक ग्लीम्प्स थ्रू लाइफ ऑफ प्रफुल्ल पटेल’ या जीवनचरित्राचे काल रविवारी वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रफुल्ल पटेल, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योजक मुकेश अंबानी, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक करण जोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना देशातील हवाई वाहतूक ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात येण्याच्या दृष्टीने भरीव असे कार्य केले. मुंबईतील विमानतळाचा विकास होण्यामध्येही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. भंडारा व गोंदीया जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विकास घडविला. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता असून या जिल्ह्यांच्या विकासात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. आज प्रकाशित होत असलेले त्यांचे उडान हे सचित्र जीवनचरित्र निश्चितच प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी प्रफुल्ल पटेल, उध्दव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.