मुंबई : नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केले.
आज ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्यावर्षी कमी फटाके वाजले. मुंबईसह राज्याचे प्रदूषण कमी झाले होते. यामध्ये शालेय मुलांनी मोठा सहभाग घेतला होता. अलिकडे मुलांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाली आहे. ते स्वत: आपले आई वडील, नातेवाईक आणि मित्रांना कमी आवाजाचे फटाके वाजवा म्हणून सांगतात. याही वर्षी मुलांनी आणि पालकांनी कमी आवाजाचे फटाके वाजवून पर्यावरणपूरक, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी. आपल्या राज्यात प्लास्टिक बंदीची मोहीम राज्यभर सुरु आहे. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. ध्वनीप्रदूषण, फटाके मुक्त दिवाळी आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबविण्यासाठी पर्यावरण विभाग झपाट्याने काम करीत आहे. या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, राज्यातील काही भागात आणि मुंबई शहरात हवा प्रदूषित झाली आहे. त्याला आपणच कारणीभूत आहोत. आपल्याकडे साजरे होणारे सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे केले तर हवा प्रदूषित होणार नाही. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होणार नाही. येणारी दिवाळी आपण सर्वांनी फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त साजरी करावी. लहान मुलांनी तर फटाकेच वाजवू नयेत. जर वाजवायचे असतील तर कमी आवाजाचे वाजवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
याच कार्यक्रमात दिव्यांग (अंध) मुलांनी तयार केलेल्या भारतातील पहिल्या ब्रेल लिपीतील दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. तसेच फटाके मुक्त, प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबतची शपथ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित मुलांना आणि नागरिकांना दिली.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई-रविंद्रन यांनी केले. त्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबतच्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर,पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी,पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.