मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्या (रविवार, दि. 30) राज्यातील बँका सुरू राहणार आहेत. याबरोबरच बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली आहे. या योजनेत सहभागापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2017 ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जनसुविधा केंद्र तसेच बँकांमध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याची दखल घेऊन रविवारी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण व निम शहरी भागातील बँका सुरू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. ज्या बँकांची सोमवारी साप्ताहिक सुटी असते त्यांनी देखील सोमवारी कामकाज चालू ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेने कळविले आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना ई-केवायसीमुळे फॉर्म भरण्यास विलंब लागतो त्यातच काही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या जाणवल्याने ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला मंजुरी देत बँकांमध्ये ई-केवायसीची माहिती घेऊन अर्ज ऑफलाईन जमा करण्यात येत आहेत. या सुविधेमुळे बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होणार असून शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारले जाणार आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागापासून कोणीही वंचित राहणार नाही. याची दक्षता राज्य शासनामार्फत घेण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी काळजी करु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.