मुंबई : ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’चा लाभ राज्यातील अधिकाधिक बेरोजगार युवक-युवतींना व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या योजनेचे स्वतंत्र वेबपोर्टल विकसित करण्यात येत आहे. यामध्ये योजनेच्या माहितीबरोबर प्रशिक्षण आणि राज्यभरातील रोजगाराच्या संधीविषयक माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.सह्याद्री अतिथीगृहात श्री. मुनगंटीवार यांच्यासमोर नुकतेच या वेब पोर्टलचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह राज्यस्तरीय बँकर्स समितीचे पदाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.हे वेबपोर्टल मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत उपलब्ध होणार असून, ते साधारणत: 9 ऑगस्ट 2018 या तारखेपासून सर्वांना उपलब्ध होईल अशी माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, या वेबपोर्टलवर राज्य तसेच जिल्हास्तरीय बँकर्स समितीमध्ये सहभागी सदस्यांची नावे, त्यांचे संपर्क क्रमांक यांची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी. मुद्रा योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना अपेक्षित असलेली सगळी माहिती या संकेतस्थळावर मिळावी. योजनेचे अर्ज, तो कुठे आणि कशा पद्धतीने करावयाचा, बेरोजगार युवकांसाठी राज्यभरात कोणकोणत्या रोजगार संधी उपलब्ध आहेत, प्रशिक्षण कुठे आणि कशा पद्धतीने मिळू शकेल अशी सर्व माहिती यात देण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाने महाराष्ट्रात जिल्हानिहाय रोजगार संधीचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणाअंती त्यांनी जिल्हानिहाय उपलब्ध असलेल्या रोजगार संधीची यादी तयार केली आहे. त्याची लिंक या संकेतस्थळावर देण्यात यावी, केंद्र आणि राज्याच्या प्रशिक्षण संस्थांची यादी यावर देण्यात यावी अशा सूचनाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केल्या.महाराष्ट्रातील सर्व बँकांची शाखानिहाय माहिती या संकेतस्थळावर देण्यात यावी. एखाद्या युवकास रोजगार सुरु करावयाचा असेल तर त्याला प्रशिक्षण कुठे मिळेल, रोजगार संधी कुठे उपलब्ध आहे आणि त्याची मशिनरी कुठे मिळेल याची माहिती, मार्गदर्शन या संकेतस्थळावरून मिळाली पाहिजे. बँक अधिकारी योजनेचा लाभ घेताना सहकार्य करत नसतील तर नागरिकांना त्याची शासनाकडे तक्रार करण्याची संधी या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जावी असेही निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी संबंधितांना दिले.राज्यातील विषमता दूर होऊन विकासाच्या प्रक्रियेला गती यावी यासाठी प्रधानमंत्र्यांनी ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. योजनेचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी यशकथा, जिंगल्स, प्रधानमंत्री यांची या योजनेसंबंधातील भाषणे, चांगले काम करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारी पत्रे अशी माहितीही या संकेतस्थळावर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.