पालघर : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले.खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.राजेंद्र केळकर आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी लता चंदरकर, सुनंदा फर्नांडीस, सुरेखा पामाळे, अशोक जाधव, जीवन गायकवाड यांना प्रातिनिधीक स्वरूपात ई कार्डचे वाटप करण्यात आले.पालकमंत्री श्री.सवरा म्हणाले, आयुष्मान भारत ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून याचा लाभ ग्रामीण भागातील 2 लाख 76 हजार तर शहरी भागातील 43 हजार 38 कुटुंबांना होणार आहे. एकूण 1122 आजारांचा समावेश असलेल्या या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.कांचन वानेरे, सूत्रसंचालन डॉ. दिनकर गावित यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी केले.
कोण असतील लाभार्थी
ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटूंब हे आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी असतील. तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे/ सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडंट, हॉटेल वेटर, मेकॅनिक/ वीजतंत्री, असेम्ब्ली, दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र असतील.या कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी 5 लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेअंतर्गत त्या कुटुंबांना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील.यासाठी लाभार्थी कुटुंबांना ई-कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय जव्हार आणि डहाणू या योजनेमध्ये समाविष्ट असतील.
योजनेची वैशिष्ट्ये :
•ही योजना पूर्णपणे नि:शुल्क असेल.
सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा समावेश (गुडघा, खुबा, कोपर प्रत्यारोपण)
•योजनेअंतर्गत 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे.
•मानसिक आजारावरील उपचारांचा समावेश.
•तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना ही कार्यान्वित आहे. आयुष्मान भारत योजनेसोबतच ही योजना चालू राहणार आहे.
•आयुष्मान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे.