मुंबई : महापालिका निवडणुकींसाठीचा प्रचार रविवारी संध्याकाळी संपलेला आहे, तरिही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रसार माध्यमांना मुलाखती देत आहेत, तेव्हा या मुलाखती म्हणजे पेड न्यूज तर नव्हे? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी मुलाखती देत सुटले आहेत. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. ते देत असलेल्या मुलाखती म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेवर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही राऊत म्हणाले आहेत. शिवसेना भवन येथे ते बोलत होते. कमळाचे चिन्ह लावून ते मुलाखती देत आहेत, हा आचारसंहितेचा भंग आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करू आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करू, असे राऊत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मुलाखती देणे हा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग आहे. त्यांना जर प्रचार करायचा आहे तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी राऊत यांनी यावेळी लावून धरली.