नवी दिल्ली, दि. ६ : लेखनी, वक्तृत्व, नेतृत्व आदि गुणांच्या बळावर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या अंगावर प्रभाव टाकणारे प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राला वैचारिक वळण लावणारे विचारवंत ठरतात, असे मत पत्रकार व लेखक सचिन परब यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे १९वे पुष्प गुंफताना ‘प्रबोधनकार ठाकरे-महाराष्ट्राला वळण लावणारा विचारवंत’ या विषयावर श्री.परब बोलत होते.
शाळेत असतांनाच लिखाणाला सुरुवात करणाऱ्या प्रबोधनकारांनी आपल्या लेखनीतून परखडपणे विचार मांडत समाजाच्या विविध वैगुण्यावर प्रहार केले. प्रचलित इतिहास लेखनाचा समाचार घेत नव इतिहासकारांची फळी निर्माण केली. हिंदू धर्माची चिकित्सा करतानाच धर्मांतराला विरोध केला. स्त्रियांच्या प्रश्नांना आवाज फोडणारे, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचा आवाज बुलंद करणारे व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही मोलाचे योगदान देणारे प्रबोधनकार ठाकरे यांनी राज्याच्या वेगवेगळ्या अंगावर प्रभाव टाकत महाराष्ट्राच्या वैचारिक पंरपरेत महत्त्वाचा ठसा उमटवला, असे श्री.परब म्हणाले.
घरच्या गरिबीमुळे मॅट्रीकनंतर शिक्षण घेऊ न शकलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्यातील हुन्नराच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली. प्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा उल्लेख ‘बहुरंगी, बहुढंगी, बहुरुपी कर्तृत्ववान पुरूष’ असा केला. तसेच त्यांच्या गुण वैशिष्ट्यांबाबत कीर म्हणतात, ‘प्रबोधनकार हे छायाचित्रकार, तैलचित्रकार, पत्रपंडित, वादविवादपटू, शिक्षक, संपादक, नाटककार, टंकलेखक, समाजसुधारक, चळवळे, वक्ते, नेते, पटकथा संवाद लेखक, चरित्रकार आणि इतिहासकार होत’.
शाळेत असतांनाच प्रबोधनकारांनी ‘विद्यार्थी’ नावाचे साप्ताहिक सुरु केले, त्यासाठी छोटासा छापखाना सुरु केला. शाळेच्या अधीक्षकाने विचारलेल्या प्रश्नावर प्रबोधनकारांनी आपल्याला मोठेपणी संपादक व्हायचे आहे असे सांगितल्याचा संदर्भ श्री.परब यांनी यावेळी नोंदवला. पुढे त्यांनी ‘सीताशुद्धी’ हे नाटक लिहिले. १९१९ मध्ये त्यांनी वक्तृत्वशास्त्रावर पहिले पुस्तक लिहिले हे मराठीतील असे पहिले पुस्तक असल्याचे श्री.परब म्हणाले.
महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात प्रबोधनकारांचे मोलाचे योगदान
महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात प्रबोधनकार ठाकरे यांचे मोलाचे योगदान असल्याची मांडणी करताना श्री.परब यांनी सांगितले, इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी ‘भारत इतिहास संशोधक मंडळाच्या’ चौथ्या वर्षाच्या अहवालात लिहिलेल्या लेखात याचे मूळ सापडते. मराठेशाहीच्या ऱ्हासासाठी ब्राह्मणेतर माणसं जबाबदार असल्याच्या श्री.राजवाडे यांच्या मतास प्रबोधनकारांनी उत्तर म्हणून ‘कोदंडाचा टणत्कार’ अर्थात ‘भारत इतिहास संशोधन मंडळाला उलट सलामी’ हा ग्रंथ लिहिला. यास इतिहासाचार्यांना उत्तर देता आले नाही. ही घटना ब्राह्मणी इतिहास लेखनाच्या पद्धतीला मोठा फटका देणारी ठरली. प्रबोधनकारांच्या या पुस्तकामुळे नवा इतिहास लिहिण्याच्या कार्यास महाराष्ट्रात सुरुवात झाली या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासाला वळण लावणारा माणूस म्हणून प्रबोधनकारांची नोंद घ्यावी लागेल, असे श्री परब म्हणाले.
ग्रंथ लिखाणासोबतच प्रबोधनकारांनी त्याकाळातील इंदौर पासून ते गोव्यापर्यंत व जळगाव पासून बेळगावपर्यंत पसरलेला महाराष्ट्र अनेकवेळा पादाक्रांत केला. गावोगावी भाषणे दिली व्याख्याने केली. ब्रिटीश सरकारमधील नोकरीचा त्याग करून त्यांनी सत्यशोधकी व ब्राह्मणेतर चळवळीचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘प्रबोध पाक्षिक’ सुरु केले.
त्यांनी पश्चिम महाराष्ट्र खळबळून उभा केला. ‘छत्रपती प्रतापसिंह’ आणि ‘रंगो बापुजी’ यांचे चरित्र लिहिले व यांवर ते सतत व्याख्यान देत फिरले.
सांस्कृतिक गुलामगिरी सोडून देण्याचा विचार प्रबोधनकार ठाकरे यांनी मांडला. तो विचार बहुजन चळवळीचा, ब्राह्मणेतर चळवळीचा आणि पुरोहितशाहीच्या विरोधात होता. हा विचार मांडण्यासाठी प्रबोधनकारांनी लिहिलेल्या पुस्तकांना राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी खंबीर साथ दिल्याचेही श्री.परब यांनी सांगितले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कोल्हापुरातील अंबादेवी मंदिरात प्रवेश नाकारल्याच्या घटनेचा समाचार घेत त्यांनी प्रबोधन वर्तमानपत्रात ‘अंबाबाईचा नायटा’ हा लेख लिहिला होता असा उल्लेखही श्री.परब यांनी अधोरेखित केला.
प्रबोधनकारांनी हिंदू धर्माची चिकित्सा केली मात्र त्यांनी हिंदुत्व सोडले नाही. हिंदू मिशनरी सोसायटी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी धर्मांतर विरोधात सातत्याने प्रचार केला. प्रबोधनामध्ये त्यांनी हिंदू धर्म संपणार नाही हे सांगणारे ‘हिंदवी निळकंठी’ नावाचे दोन लेख लिहिले आहेत. ‘देवळाचा धर्म धर्माची देवळ’ या पुस्तकातून प्रबोधनकारांच्या धर्मचिकित्सेची प्रचिती येते असे ते म्हणाले.
समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी प्रबोधनकारांनी पुढाकार घेतला. स्त्रियांच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने लिखाण केले. तिसरीत शिकणाऱ्या प्रबोधनकारांनी घराशेजारी जरठबाला विवाह होत असताना मंडप पेटवून दिला होता. त्यांनी हुंडा विरोधी चळवळ काढली. जिथे-जिथे हुंडा तिथे गाढवाहून वरात काढण्याचे काम केले. प्रबोधनकारांनी म्हटले आहे, स्त्रियांनी केलेली प्रगती हे मी पाहिलेले सर्वात मोठे स्थित्यंतर होय.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरु म्हणूनही प्रबोधनकारांची ओळख आहे. प्रबोधनकारांनी रयत शिक्षण संस्थेसाठी महात्मा गांधीजींकडे ‘हरीजन फंडातून’ पैसेही मागितल्याचा संदर्भ श्री.परब यांनी यावेळी दिला. प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. या आंदोलनातले ते शेलार मामा होते. तडफेने ते या आंदोलनात उतरले, लिखाण व भाषणांतून त्यांनी आंदोलन मजबूत केले व प्रसंगी तुरुंगवासही भोगला.
प्रबोधनकारांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या अंगावर प्रभाव टाकत त्याला वैचारिक वळण लावले असून त्यांचे हे योगदान अनन्यसाधारण असल्याचे श्री.परब यांनी सांगितले.