मुंबई : कॅलिफोर्नियातील सांताबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील २० किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा पहीला आशियाई जलतरणपटू ठरलेला प्रभात कोळीला केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या तेनसिंग नोर्गे ‘किताब जाहीर झाला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनी येत्या २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रभातला देण्यात येईल.
चेंबूरच्या बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेला प्रभात इंग्लंडच्या मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताबाच्या मानकरी असलेल्या सॅलीमेंटी ग्रॅव्हीट यांच्या मार्गदर्शानुसार सराव करणाऱ्या प्रभातने दीर्घ पल्ल्याच्या जलतरणात चांगलीच छाप पाडली आहे. खुल्या पाण्यातील जलतरणात तिहेरी यश संपादन करणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे.हवाई बेटावरील कैवी चॅनेल जलदरीत्या पोहणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे. दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागरही जलदरीत्या पोहण्याची कामगिरी प्रभातने साधली आहे. इंग्लंडमधील नॉर्थ आयर्लंड येथील नॉर्थ चॅनेल आणि जपानमधील त्सुगुरु चॅनेल पोहणारा प्रभात आशियातील पहिला जलतरणपटू आहे.