लेखक : नवनाथ मोरे/प्रशांत गायकवाड
राज्यात विधानसभा निवडणुकीचा हंगाम जोरात सुरू आहे. भाजप जिंकेल अशी निष्ठावंत इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची धारणा आहे(अपवाद सोडून). राज्यातील माध्यमांचा कॅमेराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांना प्रसिद्धी देण्यासाठी झटत आहे. सध्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याभोवतीही मुख्यमंत्रीपदाचे वलय माध्यमांनी निर्माण केले आहे. या सर्व नेत्यांत माध्यमांनी पॉवरफुल डाव्या नेत्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. डाव्या नेत्यांना प्रसिद्धी न मिळू देणे हा भांडवलदारी माध्यमांच्या षडयंत्राचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील डावे पक्ष आणि नेतेही प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहत असले तरी विविध कामगार संघटना आणि कष्टकऱ्यांमध्ये डाव्या पक्षांचे स्थान अढळ आहे. एका हाकेवर लाखोंचे मोर्चे निघतील, इतकी ताकद आहे. पण प्रसारमाध्यमांनी कम्युनिस्ट पक्षांची ही ताकद नेहमीच दडवली आहे. जाणीवपूर्वक प्रसिध्दी दिली जात नाही, हे वास्तव आहे. ही ताकद माध्यमांनी लपवल्यामुळेच इतर पक्ष आणि त्यांचे नेते यांची लोकप्रियता वाढत आहे.
सद्यघडीला डॉ.अशोक ढवळे, प्रकाश रेड्डी, मरियम ढवळे, शुभा शमीम, डॉ. अजित नवले, नरसय्या आडाम मास्तर, आमदार जे. पी. गावीत, अजित अभ्यंकर, डॉ. डी. एल. कराड, भालचंंद्र कांगो, राजन क्षीरसागर हे राज्यातील पॉवरफुल कम्युनिस्ट नेते आहेत. यापैकी प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो, राजन क्षीरसागर हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तर इतर भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आहेत. सर्व नेते उच्च शिक्षित असून कष्टकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी परिवर्तनाचे ध्येय ठेवून कष्टकरी, कामगार, वंचित घटकांसाठी निष्ठेने कार्य करत आहेत. डाव्या पक्षांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही जनतेच्या न्यायासाठी लढणारे डावे हे देशात एकमेव आहेत.
नाशिक ते मुंबई या शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व मोर्चाने तर डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सवयीप्रमाणे मोर्चाचे श्रेय न घेता कार्यरत राहणे पसंत केले. कारण श्रेय हे जनता ठरवत असते आणि जनताच डाव्यांचे पाठबळ राहिले आहे. डॉ. अशोक ढवळे हे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून माकपचे केंद्रीय सचिवमंडळ सदस्य आहेत. डॉ. अजित नवले डॉक्टर असले तरी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अविरतपणे लढत आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस आहे. किसान लाँग मार्चचे प्रणेते आमदार जे. पी. गावीत हे माकपचे कळवण-सुरगाणा मतदार संघातून ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ लोकसभा निवडणूक लढवली असून एक लाखापेक्षा जास्त मते त्यांनी मिळवली होती. आता ते विधानसभा निवडणूक रिंगणात आहेत.
बिडी कामगार, असंघटित क्षेत्र आदी प्रश्नांना विधानसभेत मांडले आणि न्यायही मिळवून दिला, ते आडाम मास्तर राज्याला परिचीत आहेत. जनतेच्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावरची लढाई लढली. त्यांनी कधीही त्यावेळी आमदारकीचा अभिमान बाळगला नाही. बिडी कामगारांना हक्काची तीस हजार घरे त्यांनी मिळवून दिली आहेत. ते माकपचे जनरल सेक्रेटरी असून सोलापूर शहर मध्य मधून निवडणूक रिंगणात आहेत.
महिला अत्याचार, महिलांच्या अनेक प्रश्नांंना घेऊन जनवादी महिला संघटना सातत्याने लढत आहे, त्या मरियम ढवळे जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. आशा वर्कर्स-गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्या मानधन वाढ आदी लढ्याचे नेतृत्व सिटूच्या झेंड्याखाली करत असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी शुभा शमीम लढत आहेत. असंघटीत कामगारांचे असंख्य प्रश्नांना न्याय देणारे डॉ. डी. एल. कराड हे डॉक्टर असून अविरत कामगारांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. ते सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून नाशिक पश्चिम मतदार संघातून रिंगणात आहेत. माकपचे असंघटित क्षेत्रात काम करणारे आणि अभ्यासू व्यक्तीमत्व अजित अभ्यंकर यांचे नाव घेतले जाते. अर्थशास्त्राचे ते गाढे अभ्यासक आहेत. विविध चँनेलच्या माध्यमातून ते भूमिका मांडत असतात.
कामगार, शेतकरी प्रश्नांबात लढणारे भालचंद्र कांगो हे भाकपचे जनरल सेक्रेटरी आहेत. प्रकाश रेड्डी हे असंघटीत कामगार क्षेत्रात कार्यरत असून भाकपचे नेते आहेत. शेतकरी प्रश्नावर लढणारे राजन क्षीरसागर हे परभणी लोकसभा मतदार संघातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात होते.
डाव्यांनी आजवर लाखोंचे मोर्चे त्यांनी काढले आहेत. कामगार, शेतकरी विश्वात त्यांना मानाचे स्थान आहे. तसे पाहता सर्वच डाव्या नेत्यांचे कामगार, शेतकी, इतर क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य आहे. डावे पक्ष रस्त्यावरची लढाई जास्त लढून उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देत आहेत. आज राज्यातील पॉवरफुल कम्युनिस्ट नेते लाखो कॉम्रेडसच्या सहकार्याने देशसेवेचे कार्य पार पाडत आहेत, त्यांना लाल सलाम!