मुंबई : उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सब-ज्युनिअर महिला गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ह्रित्विका सरदेसाईचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी अभिनंदन केले. ह्रित्विका खालसा महाविद्यालयाची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे.ह्रित्विका सरदेसाईने आपले वडील तथा छत्रपती पुरस्कार विजेते कोच संजय सरदेसाई यांच्यासोबत आज राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना स्पर्धेत मिळालेली पदके आणि प्रमाणपत्रे दाखविली. राज्यपालांनी यावेळी ह्रित्विकाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिनांक १ मे ते ६ मेदरम्यान उदयपूर (राजस्थान) येथे झालेल्या या स्पर्धेच्या ६३ किलोग्रॅम वर्ग गटात ह्रित्विकाने भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये आशियातील पाच इतर देशातील स्पर्धकांनीदेखील भाग घेतला असल्याची माहिती तिने यावेळी दिली.