मुंबई : राज्यातील विविध १७ नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या १० सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत १० डिसेंबर व १३ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.
सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी १० डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०१७ पर्यंत असणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ नोव्हेंबर २०१७ रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २८ नोव्हेंबर २०१७ तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. डिसेंबर २०१७ रोजी मतदान होईल. ११ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी होईल. डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या ११ नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी १३ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे १८ ते २४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत स्वीकारली जातील. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान १३ डिसेंबर २०१७ रोजी होईल. मतमोजणी १४ डिसेंबर २०१७ रोजी होईल.
मुंबई महापालिकेची पोट निवडणूक जाहीर
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ च्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि प्रभाग क्रमांक ६२ मधील चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. या दोन्ही प्रभागातील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.