मुंबई – राज्यात पोस्टमन पदाच्या सुमारे सहा हजार जागा रिक्त आहेत. सरकारने या रिक्त जागा त्वरित भराव्यात, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील पोस्टमन ४ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना उपाशीपोटी सेवा देऊन अनोखे आंदोलन करणार आहेत. मात्र या मागण्यांची शासनाने पूर्तता न केल्यास ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली जाईल, असा इशारा ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात पोस्टमन पदाच्या ४४३५ व गृप डीच्या १४३१ रिक्त जागा आहेत. या रिक्त त्वरित भराव्यात, अशी वारंवार मागणी केली जाते. मात्र रिक्त पदे भरली जात नसल्याने सद्या कार्यरत असणाऱ्या कामगारांवर कामाचा भार येतो. त्यामुळे रिक्त जागांची भरती व या ईतर प्रमुख मागण्यासाठी ४ ऑक्टोम्बर ते ६ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पोस्टमन व ग्रुप डी कामगार काहीही न खाता-पीता उपाशी राहून आपले संपूर्ण काम पूर्ण करत जनतेची सेवा करण्याचे कर्तव्य बजावणार आहेत. गांधीगिरी पद्धतीने एक आंदोलन करून राज्य सरकारला पोस्टमनच्या समस्यांची जाणीव करून दिली जाणार आहे. मात्र या वेळेत प्रशासनाने मागण्या न सोडवल्यास पोस्टमन ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जातील, असा ईशारा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र सचिव कॉ. बाळकृष्ण चाळके व उपसचिव कॉ. राजेश सारंग यांनी दिला आहे.