नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या 12 महत्वाच्या क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती-मेढा येथे बंधारे बंदर प्रकल्प समाविष्ट करण्यात आला आहे. केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली. कोकणातले माजी आमदार राजन तेली यांनी आज या संदर्भात सुरेश प्रभू यांची भेट घेतली असता हा बंधारा बंदर बांधण्याचा प्रस्ताव याआधीच महाराष्ट्र सागरी मंडळाला पाठवला असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
महाराष्ट्र सागरी मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर बंदर बांधण्याचे काम त्वरित मार्गी लावावे असे निर्देश प्रभू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या भागात सध्या असे बंदर नसल्यामुळे मच्छिमारांच्या उपजीवीकेवर मोठा परिणाम होत आहे. हे मच्छिमार पूर्णत: निसर्ग आणि समुद्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीत त्यांना समुद्रात मासेमारी करायला जाता येत नाही. हे बंदर झाल्यास विपरित स्थितीतही मच्छिमार मासेमारीसाठी जाऊ शकतील. तसेच या बंदरावर क्रुझ शीपचा धक्का असेल त्यामुळे या भागात पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल. बंदराशी निगडीत इतर उपक्रमही या ठिकाणी सुरु होतील आणि पर्यायाने इथल्या स्थानिकांचे जीवनमान सुधारेल अशी अपेक्षा सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली.