मुंबई : महिला या मूलत: उत्तम व्यवस्थापक असतात, त्यांना संधी दिल्यास त्या या कौशल्यातून ना केवळ स्वत:च्या संसाराला हातभार लावतात तर राज्याचं आर्थिक चक्रही गतिमान ठेवण्यास मदत करतात. अशीच गोष्ट चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. आदिवासी महिला पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनीच्या मालक झाल्या. राज्यातील हा पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून आकाराला आला असून, पहिल्या टप्प्यात पोंभुर्ण्यातील ३०० महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल.टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मूल, पोंभुर्णा आणि गोंड पिंपरी येथे १ हजार आदिवासी महिलांचा एक कुक्कुटपालन प्रकल्प ‘पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी लि’ नावाने सुरु करण्यात आली आहे. ३०० महिलांना कुक्कुट शेड देण्यात आले आहे. १२ एप्रिलपर्यंत त्यांना ब्रॉयलर पिल्ले देण्यात येणार असून आदिवासी महिलांच्या मालकीच्या या पहिल्या कंपनीची पहिली बोर्ड मिटिंग नुकतीच चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.या प्रकल्पासाठी ‘प्रदान’ या स्वयंसेवी संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. या संस्थेने पूर्वी आसाम, ओरिसा, मध्यप्रदेश आणि झारखंडमध्ये काम केले आहे. कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स याच महिलांमधून निवडले जातील. पहिल्या वर्षी ३००, दुसऱ्या वर्षी ४०० आणि तिसऱ्या वर्षी ३०० महिलांना यातून लाभ दिला जाईल. पोंभुर्णा, मूल आणि गोंड पिंपरी तालुक्यांमधील आदिवासी महिलांसाठी असलेल्या या प्रकल्पांमध्ये राज्य शासनाने १२ कोटी तर टाटा ट्रस्टने ३ कोटी रुपये दिले आहेत. यात प्रत्येक महिलेला १ दिवसाची ५०० पिल्ले दिले जातील. ४० दिवसांपर्यंत पक्षी मोठे केल्यानंतर त्यांच्या विक्रीतून महिलांना उत्पन्न मिळू शकेल. प्रत्येक महिलेला ४० दिवसांच्या बॅचनंतर ५०० पक्ष्यांच्या मागे ६ ते ८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. या कंपनीचा पहिल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन मानव विकास कार्यक्रमांतर्गत इतर आदिवासी तालुक्यांमध्येही हा उपक्रम राबविला जाईल, अशी माहिती अर्थमंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.