रत्नागिरी, (आरकेजी) : माडबन परीसरातल्या चिरेखाणीत काल पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडालेल्या पोलिसाचा मृतदेह आज पहाटे सापडला.कोस्ट गार्डच्या स्कुबा ड्रायव्हरना हा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
राजापूर तालुक्यातील माडबन परिसरातील चिरेखाणीमध्ये काल सायंकाळी प्रशांत विचारेसह तीन पोलीस पोहायला गेले होते. जिल्हा पोलीस मुख्यालयात शीघ्र कृती दलात हे तिघेही कार्यरत आहेत. तिघांपैकी प्रशांत चिरेखाणीत बुडाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.
प्रशांत २०१४ मध्ये जिल्हा पोलीस दलात रुजू झाले होते. एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर ते २०१५ पासून जिल्हा मुख्यालयात सेवेत होते. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने अनेकवेळा माडबन इथे बंदोबस्तासाठी ते जात असत. त्यामुळे त्यांना या परिसराची माहिती होती. त्यांना उत्तम पोहताही येत होतं.
दरम्यान रात्री उशीरापर्यंत प्रशांतचा त्याचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर आज पहाटे मृतदेह सापडला.