मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांचा नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांचा काळा बाजार सुरुच असल्याचे समोर येत आहे. घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई करत एक कोटी एकावन्न लाख अठ्ठयाहत्तर हजार पाचशे रुपये इतकी रक्कम असलेल्या जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या. पंच्चावन टक्के कमिशन घेऊन या नोटा बदलल्या जाणार होत्या.
चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांना मिळाली होती. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक याकूब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. लालबहादूरशास्त्री मार्गावरील दीपा हॉटेलजवळ एक भरधाव वेगातील टॅक्सी थांबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ती थांबली नाही. पोलीस पथकाने तिचा पाठलाग करत पूजा हॉटेलजवळ गाठले. पथकाने पाहणी केली. दोन काळ्या रंगाच्या बॅग्स सापडल्या. त्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. रिहान शेख (३०- राहणार रे रोड) , दानिश कुरेशी (२६-जरीमरी कुर्ला), रिझवान काजी (४५ – डॉकयार्ड रोड), अय्याज अत्त्तर(३६- डॉकयार्ड रोड) यांना अटक करण्यात आली.
चौकशीत हे पैसे गोराईवरून एका व्यक्तीकडून त्यांनी पंचावन्न टक्के कमिशन घेऊन बदलण्यास घाटकोपर विभागात आणले असल्याचे समजले. सध्या फक्त एनआरआय व्यक्तीच बँकेतून पैसे बदलून देऊ शकते, त्यामुळे कोणता परदेशी व्यक्ती सहभागी आहे का? हा पैसा नक्की कोणाकडून आणला ? या बाबत पोलीस तपास करीत आहेत. न्यायालयाने आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली. घाटकोपर पोलिसांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अशी कारवाई केल्याने परिमंडळ सातचे उपायुक्त सचिन पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.