मुंबई (दिनेश चिलप मराठे): दुपारी साडेतीनची वेळ, डोक्यावर सूर्य आग ओकू लागला. अचानक डी. बी. पोलीस स्टेशनचा दूरध्वनी वाजला आणि पोलिसांची मोबाईल व्हॅनने त्या दिशेने रवाना झाली. घटना काय असेल, याचा कोणालाही थांगपत्ता नव्हता. अखेर पोलिसांची व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. आणि त्यांच्या नजरेस पडली अनिता शेख ही ३३ वर्षीय महिला. अनिताला प्रसूतीकळा असह्य झाल्या होत्या. पोलिसांनी तिला पाहताच क्षणाचा विचार न करता थेट गाडीत घेऊन रुग्णालयाचा रस्ता मापण्यास सुरुवात केली. व्हॅन जशिजशी अंतर कापू लागली, तशा अनिताच्या वेदना वाढू लागल्या होत्या. अखेर पोलीस व्हॅनमध्येच अनिताची प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पोलिसांच्या रूपाने अनिताला देवदूत मिळाले होते, आणि यामुळेच ती अन तिचे बाळ सुखरूप होते.
गिरगाव परिसरातील डी. बी. पोलिस ठाणेत पोलीस शिपाई किरण कोठुळे, पोलीस नाईक वाहन चालक शिंगटे आणि नागरे कर्तव्यदक्षेवर असताना दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांनी दूरध्वनी आला. खेतवाडी येथील रिलायंस हॉस्पिटल जवळ एक महिला आजारी असून तिला तात्काळ मदतीची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांची मदतनीस व्हॅन घटनास्थळकडे रवाना झाले. घटनास्थळी त्यांच्या नजरेस एक नऊ महिन्यांची गरोदर महिला पडली. प्रसुतीच्या असह्य वेदनेने तळमळत होती. ही बाब महिला पोलिस कोठुळे यांच्या लक्षात येताच खाकी वर्दीतील पोलिसांनी त्या महिलेला अलगद उचलून पोलिस गाडीत घेतले. आणि “ऑपरेशन सेव्ह लाइफ” व्हॅन नायर रुग्णालयाच्या दिशेने प्रयाण केले. इकडे अनिताच्या बाळंतकळा सुरु झाल्या होत्या. वेदनेने ती हैराण झाली होती. मात्र तिच्यासोबत यावेळी खाकी व्यतिरिक्त एकही ओळखीचा चेहरा नव्हता. रुग्णालय जवळ येत होतं तशी तिच्या वेदना वाढत होत्या. अखेर पोलिस व्हॅनमध्येच अनिताने एका छान गोंडस बाळास जन्म दिला. यावेळी महिला पोलिसांनी ‘सुईण’ची भूमिका बजावली. बाळाला कापडात घट्ट गुंडाळले. तोपर्यंत नायर रुग्णालय जवळ आले व पोलिसांनी आई व बाळाला रुग्णालयात दाखल केले. सध्या आई व बळावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खाकीवर्दीतील त्या तीन देवदुतांमुळे एका महिलेच्या मातृत्वाला जीवदान मिळाल्याची सुखद वार्ता सर्वत्र वाऱ्या सारखी पसरली आणि तीन्ही पोलिसांवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. आपल्यासाठी देवदुतांच्या रुपात धावलेल्या या तीन्ही खाकी वर्दीतील पोलिसांचे अनीता शेख यांनी आनंदाश्रुनी भरलेल्या डोळ्यांनी हसत हसत आभार मानले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांनी आपल्या या पोलिस अंमलदारांचे मनापासून कौतुक करीत त्यांना शाबासकी दिली.