
रत्नागिरी : आँन ड्युटी चौविस तास सेवेत तत्पर असणारी व्यक्ती म्हणजे पोलिस. पण कायदा हातात घेणाऱ्यांवर वचक ठेवणाऱ्या याच खाकीतल्या माणसांनी अनोखा आदर्श समोर ठेवला आहे. रत्नागिरी पोलिसांनी रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी आज स्वच्छता अभियान राबवले. हा संपुर्ण समुद्रकिनारा स्वच्छ केला. जवळपास १३० कर्मचारी आणि १५ अधिकाऱ्यांनी हि स्वच्छता मोहिम राबवली.
समुद्रकिनाऱ्यांवरचा कचरा हा प्रश्न गंभीर होत चाललाय. अशा वेळी अनेक संस्था समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी किनाऱ्याचे पालकत्व स्विकारतायत. अशातच कामात व्यस्त असणाऱ्या पोलिसांनी सुद्धा समाजाबद्दल बांधीलकी दाखवली.
आज (बुधवार) पोलिसांच्या रेझिंग डेचा समारोप होतोय. या दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी पोलिसांनी स्वच्छतेच्या माध्यमातून अनोखा संदेश दिला. यात किनाऱ्यावरील सर्व प्रकारचा कचरा पोलिसांनी उचलत किनारा साफ केला. यामध्ये प्लॅस्टिक बाटल्या, समुद्रातून वाहून आलेला ओला कचरा, असा सर्व कचरा पोलिसांना उचलून किनारा चकाचक केला. पोलिस महिला कर्मचारी सुद्धा या स्वच्छता मोहिमेत उतरले होते. गोळा करण्यात आलेला कचरा लगेचच घंटागाडीत देण्यात आला. विशेष म्हणजे रत्नागिरी पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे सुद्धा या स्वच्छता मोहिमेत स्वतः सहभागी झाले होते. त्यांनी सुद्धा किनाऱ्यावरच्या स्वच्छता मोहमेत सहभाग नोंदवला. या स्वच्छता मोहिमेत प्लॅस्टिक कचऱ्यासोबत दारूच्या बाटल्यांचा मोठा समावेश होता. त्यामुळे किनाऱ्यावर आपण फिरायला जाताना काळजी घेण्याची तेवढीच आवश्यकता आहे.















