नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा कुठल्याही धर्माच्या कुठल्याही भारतीयावर परिणाम करणारा नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले आहेत.
‘नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन होत असलेला हिंसाचार दुर्दैवी आणि अत्यंत व्यथित करणारा आहे.’, अशा प्रकारे त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
वाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीतील आवश्यक भाग आहेत मात्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि दैनंदिन जीवन विस्कळीत करणे कुठल्याही नीतीशास्त्राला धरून नाहीत.
नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 ला संसदेच्या दोन्ही सभागृहात भरभरून प्रतिसाद मिळून मंजूर झाला. राजकीय पक्ष आणि खासदारांनी मोठ्या संख्येने तो मंजूर केला. हा कायदा स्वीकार, सलोखा, दयाभाव आणि बंधुभाव ही भारताच्या शतकानुशतकांची जुनी संस्कृती अधोरेखित करणारा आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा कुठल्याही धर्माच्या भारतीय नागरिकांवर परिणाम करणारा नाही, याची ग्वाही मी देशवासियांना देत आहे. देशाबाहेर वर्षानुवर्ष छळ सोसलेल्या आणि भारताव्यतिरिक्त इतरत्र कुठेही स्थान नसलेल्यांसाठी हा कायदा आहे.
भारताचा विकास आणि प्रत्येक भारतीयाचे विशेषत: गरीब, पीडित आणि वंचितांचे सक्षमीकरण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे, ही काळाची गरज आहे.
आपल्यात फूट पाडणाऱ्या आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या गटांच्या स्वार्थी हेतूंना आपण थारा देता कामा नये.
शांती, एकता आणि बंधुभाव राखण्याचा हा काळ आहे. अफवा आणि अपप्रचार यापासून दूर राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
,
—
Regards,