नवी दिल्ली : देशाच्या कोटी कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने एका समावेशक राज्यघटनेची निर्मिती केली. आपल्या या समावेशक राज्यघटनेने एका नव्या भारताची निर्मिती केली. आपल्यासाठी ही समावेशक राज्यघटना एका नव्या भारताचा संकल्प घेऊन आली. आपल्यासाठी काही जबाबदाऱ्या घेऊन आली. आपल्यासाठी सीमारेषा निश्चित करून आली. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी समाजाच्या प्रत्येक वर्गाला, प्रत्येक घटकाला, भारताच्या प्रत्येक भूभागाला पुढे जाण्यासाठी समान संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने आपली राज्यघटना आपल्याला मार्गदर्शन करत असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधीत करताना केले आणि स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपली राज्यघटना आपल्याला सांगत असते, भारताच्या तिरंगी झेंड्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते, गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, सर्व लोकांना पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे, आपला कनिष्ठ मध्यमवर्ग, मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्गाला प्रगती करताना कोणतेही अडथळे येता कामा नयेत, सरकारची अडचण येऊ नये, समाजव्यवस्थेने त्यांच्या स्वप्नांना दडपून टाकू नये, त्यांना जास्तीत जास्त संधी मिळाल्या पाहिजेत, त्यांना जितकी प्रगती करायची असेल, जितका विकास करायचा असेल तितका करण्यासाठी पोषक वातावरण असेल, असेही ते म्हणाले.
आपले ज्येष्ठ नागरिक, आपले दिव्यांग, महिलावर्ग, दलित पीडित शोषित वर्गाला, जंगलांमध्ये राहून उपजीविका करणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या आशा आकांक्षांनुसार पुढे जाण्याची संधी मिळेल. एक स्वावलंबी भारत असेल. एक बलशाली भारत असेल. विकासाच्या गतीत सातत्य राखणारा, यशाची नवी शिखरे गाठणारा भारत असेल. जगामध्ये भारताची पत असेल, केवळ इतकेच नाही तर आम्हाला असे वाटते की जगामध्ये भारताची चमक देखील असेल, अशा भारताची निर्मिती करण्याची आमची इच्छा आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मी यापूर्वी देखील माझ्या मनातील टीम इंडियाची संकल्पना तुमच्यासमोर मांडली आहे. जेव्हा सव्वाशे कोटी देशवासीयांची भागीदारी होते, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिक आमच्याशी जोडला जातो, सव्वाशे कोटी स्वप्ने, सव्वाशे कोटी संकल्प, सव्वाशे कोटी पुरुषार्थ, जेव्हा निर्धारित लक्ष्यप्राप्तीसाठी योग्य दिशेने वाटचाल करू लागतात, तेव्हा काय होऊ शकत नाही?, असे ते म्हणाले.
मी आज माझ्या संपूर्ण विनम्रतेने, मोठ्या आदराने हे नक्कीच सांगेन. 2014 मध्ये या देशाचे नागरिक केवळ सरकार बनवून थांबले नव्हते, ते केवळ सरकार बनवून थांबले नाहीत, तर देश घडवण्यासाठी देखील कामाला लागले आहेत, लागले होते आणि लागून राहतील. हेच आपल्या देशाचे सामर्थ्य आहे. सव्वाशे कोटी देशवासी, भारतातील सहा लाखांपेक्षा जास्त गावे, आज अरविंद यांची जयंती आहे. अरविंद यांनी अतिशय योग्य गोष्ट सांगितली होती. अरविंद यांनी म्हटले होते की राष्ट्र काय आहे, आपली मातृभूमी काय आहे, ही केवळ जमिनीचा एक तुकडा नाही आहे, हे केवळ एक संबोधन नाही, ही कोणतीही कवीकल्पना नाही, राष्ट्र एक विशाल शक्ती आहे जी असंख्य लहान लहान घटकांना संघटित उर्जेचे मूर्त रुप देते. अरविंद यांची ही संकल्पनाच देशाच्या नागरिकांना देशाला पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देईल. मात्र, आपण पुढे जात आहोत हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण कुठून सुरुवात केली होती त्यावर आपली नजर जात नाही. आपण आपल्या प्रवासाची सुरुवात कुठून केली होती, त्याकडे आपण पाहिले नाही तर आपण कुठे चाललो किती चाललो याचा कदाचित अंदाज येणार नाही आणि म्हणूनच 2013 मध्ये आपला देश ज्या गतीने वाटचाल करत होता, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात 2013 ची गती होती. त्या 2013च्या गतीला जर आपण आधार मानून विचार केला आणि गेल्या चार वर्षात जी कामे झाली आहेत त्या कामांचा आपण जर आढावा घेतला तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशाची गती काय आहे, प्रगती काय आहे, कोणत्या गतीने देश वाटचाल करत आहे. शौचालयाच्या निर्मितीचेच उदाहरण घ्या ना, शौचालये बांधण्याची 2013 ची जी गती होती त्या गतीने जर चालत राहिलो असतो न जाणो किती दशके उलटून गेली असती, शौचालयांना शंभर टक्के पूर्ण करण्यामध्ये, असा प्रश्न त्यांनी विचारला.
जर आम्ही गावांमध्ये वीज पोहोचवण्याविषयी बोलत असू आणि त्याबाबत 2013च्या आधारे विचार केला तर बघा एलपीजी गॅस कनेक्शन गरीबांना, गरीब मातेला धुरापासून मुक्ती देणारी शेगडी याबाबत जर 2013च्या गतीने वाटचाल केली असती तर ही कामे पूर्ण करायला कदाचित 100 वर्षे देखील कमी पडली असती. जर आपण 13 च्या गतीने ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारत राहिलो असतो तर ऑप्टिकल फायबर लावण्यामध्ये तर कदाचित काही पिढ्या लागल्या असत्या. हा वेग, ही गती ही प्रगती या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी आम्ही पुढे वाटचाल करत आहोत, असेही ते म्हणाले.
आज देश दुप्पट महामार्ग बनवत आहे. देश चारपटीने गावात नवी घरे उभारत आहे. देश आज अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करत आहे तर देश मोबाईल फोनची देखील विक्रमी निर्मिती करत आहे. देशात आज ट्रॅक्टरची विक्रमी खरेदी होत आहे. गावातील शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करत आहेत, ट्रॅक्टर्सची विक्रमी खरेदी होत आहे. तर दुसरीकडे आज देशात स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात विमान खरेदी केली जात आहेत. देश आज शाळांमध्ये नवीन शौचालये बनविण्याचा विक्रम करत आहे, तर देश आज नवीन आयआयएम, नवीन आयआयटी, नवीन एम्सची स्थापन करत आहे. देश आज छोट्या छोट्या ठिकाणी नवीन कौशल्य अभियानाला चालना देत नवनवीन कौशल्य केंद्रे स्थापन करत आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये स्टार्टअपची लाट आली आहे, असे म्हणत त्यांनी विकास कामांची माहिती देशवासियांसमोर ठेवली.
भारत एकीकडे डिजिटल भारत बनवण्यासाठी काम करत आहे. तर दुसरीकडे माझ्या दिव्यांग बंधू-भगिनींसाठी सामायिक चिन्हाचा शब्दकोश बनवण्याचे काम तेवढ्याच तन्मयतेने आज देश करत आहे. देशातील शेतकरी सध्या आधुनिकता, वैज्ञानिकता जाणून घेण्यासाठी ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन, स्प्रिंकलर्स यावर काम करत आहेत. तर दुसरीकडे 99 जुने बंद पडलेले सिंचन प्रकल्प पुन्हा सुरु केले जात आहेत. आपल्या देशातील सैन्य कुठलेही नैसर्गिक आपत्ती असो, संकट असे, मैत्री, करूणा, मायेसह धावून जात आहे. मात्र हेच सैन्य जेव्हा संकल्प करते, तेव्हा लक्ष्यभेदी कारवाई करून शत्रूला नामोहरम करून येते. हा आपला देश, विकासाचा कॅनव्हास किती मोठा आहे. मोठ्या कॅनव्हासवर मोठ्या उत्साहाने पुढे जात आहे, असे त्यांनी सांगितले.
मी गुजरातमधून आलो आहे. गुजरातमध्ये एक म्हण आहे. ‘निशाणा चूक माफ, लेकिन नही माफ निचु निशाणा’ म्हणजेच लक्ष्य मोठे असायला हवे, स्वप्ने मोठी असायला हवीत, त्यासाठी मेहनत करावी लागते, उत्तर द्यावे लागते. मात्र लक्ष्य मोठी नसतील, दूरची नसतील तर समाज जीवनाचे निर्णय होत नाहीत. विकास खुंटतो, म्हणूनच आपल्यासाठी आवश्यक आहे कि नवीन उद्दिष्ट घेऊन, नवीन संकल्प घेऊन पुढे जायला हवे. जेव्हा लक्ष्य मोठे नसते, तेव्हा आवश्यक निर्णय देखील वर्षानुवर्षे होत नाहीत. या देशाचे अर्थतज्ज्ञ, शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, शेतकऱ्यांकडून मागणी होत होती की शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट किमान हमी भाव मिळायला हवा, वर्षानुवर्षे चर्चा सुरु होती, फायली इथेतिथे जात होत्या, मात्र आम्ही निर्णय घेतला, दीडपट हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
जीएसटी, कोण सहमत नव्हते, सर्वांना जीएसटी हवे होते. मात्र निर्णय कुणी घेत नव्हते. निर्णय घेण्यात माझा लाभ, राजकारण, निवडणुका यांचा दबाव होता. आज माझ्या देशातील छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या मदतीने, खुलेपणाने नव्या गोष्टी स्वीकारण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आज देशाने जीएसटी लागू केला. व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला. देशातील व्यापार समुदायाला जीएसटी बरोबर सुरुवातीला अडचणी येऊनही त्यांनी ते स्वीकारले, देशाला पुढे नेले. आज बँकिंग क्षेत्राला ताकदवान बनवण्यासाठी दिवाळखोरी कायदा आहे, कुणी थांबवले होते, मात्र तो झाला नव्हता, त्यासाठी धाडस लागते, इच्छाशक्ती लागते, जनता जनार्दनासाठी समर्पित होण्याची वृत्ती लागते. बेनामी संपत्ती कायद्याचे उदाहरण घ्या, मनोबल उंच असते, देशासाठी काही करण्याची इच्छा असते, तेव्हा बेनामी संपत्ती कायदा लागू होतो. माझ्या देशाचे जवान 3-4 दशके अनेक वर्षे समान पद, समान वेतन मागणी करत होते. शिस्त असल्यामुळे आंदोलन करत नव्हते, मात्र आवाज उठवत होते. कुणी ऐकत नव्हते. कुणीतरी निर्णय घ्यायला हवा होता. तुम्ही ती जबाबदारी आमच्यावर सोपवली, आम्ही ती पूर्ण केली, असे पंतप्रधानांनी सांगितले.