नवी दिल्ली : आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी संकटावर मात करण्यासाठी देशवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जलसंकटावर मात करण्यासाठी उपायही सूचविले.
पंतप्रधान म्हणाले, नरेंद्रमोदी ॲप आणि ‘मायगव्ह’ यांच्यावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया वाचत होतो, त्यावेळी लक्षात आलं, पाणी समस्येविषयी अनेक लोकांनी खूप काही लिहिलं आहे. बेलगावीच्या पवन गौराई, भुवनेश्वरचे सीतांशू मोहन परीदा यांच्याशिवाय यश शर्मा, शाहाब अल्ताफ आणि आणखी अनेक लोकांनी पाण्याशी संबंधित असलेल्या आव्हानांविषयी लिहिलं आहे. पाण्याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे. ऋग्वेदामधल्या ‘आपः सुक्तम्’मध्ये पाण्याविषयी नमूद केलं आहे की:-
आपो हिष्ठा मयो भुवः स्था न ऊर्जे दधातन, महे रणाय चक्षसे,
यो वः शिवतमो रसः, तस्य भाजयतेह नः उषतीरिव मातरः ।
याच अर्थ असा आहे की, जल म्हणजे जीवन दायिनी शक्ती, ऊर्जेचे स्त्रोत आहे. पाणी मातेसमान असून, मातृवत आशीर्वाद मिळावेत. जलरूपी मातेची कृपा आपल्यावर कायम रहावी. पाण्याच्या कमतरतेमुळे देशाच्या अनेक भागामध्ये दरवर्षी दुष्काळ पडतो. वर्षभर जेवढा पाऊस आपल्याकडे पडतो, त्यापैकी केवळ आठ टक्के पावसाचे पाणी आपण वाचवतो, हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. फक्त आणि फक्त आठ टक्के पाण्याची बचत आपण करतो, म्हणूनच आता या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. आपण सर्वांनी इतर अनेक समस्यांवर ज्याप्रमाणे जनभागीदारीतून, जनशक्तीतून उत्तर शोधून काढले, त्याचप्रमाणे पाणी समस्येवर एकशे तीस कोटी देशवासिय सर्व सामर्थ्यानिशी, सर्वांच्या सहकार्याने आणि दृढ संकल्पाने उत्तर शोधून काढतील. पाण्याचं महत्व सर्वात जास्त आहे, हे लक्षात घेवून देशामध्ये आता नवीन जलशक्ती मंत्रालय बनवण्यात आलं आहे. यामुळे पाण्याशी संबंधित असलेल्या सर्व विषयांवर वेगानं निर्णय घेणं शक्य होईल.
पंतप्रधान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी थोडं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला. देशभरातल्या सरपंचांना, ग्राम प्रधानांना पत्र लिहिलं. पाणी वाचवण्यासाठी, पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी, पावसाचा थेंब न थेंब वाया जावू नये, पावसाच्या पाण्याची बचत करण्यासाठी गाव प्रमुखांनी ग्रामसभा, बैठका बोलावाव्यात. गावकऱ्यांबरोबर बसून चर्चा-विनिमय करावे, असं या पत्रात मी त्यांना लिहिलं आहे. या कामामध्ये सरपंच, गाव प्रमुखांनी अतिशय उत्साह दाखवला, याचा मला खूप आनंद आहे. या महिन्याच्या 22 तारखेला देशातल्या हजारो पंचायतीमंध्ये करोडो लोकांनी श्रमदान केलं. गावां-गावांमध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा आणि पावसाच्या पाण्याची बचत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
पंतप्रधानम्हणाले की, आजच्या या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये आपल्याला एका सरपंचाची गोष्ट ऐकवू इच्छितो. झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यातल्या कटकमसांडी ब्लॉकच्या लुपुंग पंचायतीच्या सरपंचांनी आपल्या सर्वांना काय संदेश दिला आहे, ते ऐका —
‘‘माझं नाव दिलीपकुमार रविदास आहे. पाणी बचतीविषयी ज्यावेळी पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र माझ्या हाती आलं, ते पाहून, आधी माझा विश्वासच बसला नाही. पंतप्रधानांनी आपल्याला पत्र लिहिलंय हे खरंच वाटत नव्हतं. आम्ही 22 तारखेला गावातल्या सर्व लोकांना एकत्रित करून पंतप्रधानांच्या पत्राचं जाहीर वाचन केलं, त्यावेळी गावातले सर्व लोक उत्साहित झाले. सर्वांनी मिळून पाणी बचतीसाठी तलावाची स्वच्छता केली आणि नवीन तलाव बनवण्यासाठी श्रमदान करण्यासाठी, प्रत्येक गावकरी या कामामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाले. पावसाळा सुरू होण्याआधी हा उपाय केला तर आगामी काळात आम्हाला पाणी कमी पडणार नाही. आमच्या पंतप्रधानांनी आम्हाला अतिशय योग्य वेळी पाणी बचतीची जाणीव करून दिली हे खूप चांगलं झालं.’’
पंतप्रधान पुढे म्हणाले की, बिरसा मुंडा यांची ही भूमी आहे. निसर्गाबरोबर समतोल साधून राहणं हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. तिथले लोक, पुन्हा एकदा जल संरक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावण्यासाठी सिद्ध झाले आहेत. पाणी वाचवण्यासाठी सर्व ग्राम प्रधानांनी, सर्व सरपंचांनी, जी सक्रियता दाखवली, त्याबद्दल या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. देशभरातल्या अनेक संरपंचांनी जल संरक्षणाचा असाच संकल्प केला आहे. एक प्रकारे ही संपूर्ण गावालाच कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळं गावातले लोक आता आपआपल्या गावामध्ये जणू जलमंदिर बनवण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. सामूहिक प्रयत्न केले तर खूप चांगले सकारात्मक परिणाम मिळतात, हे मी याआधीच सांगितलं आहे. तेच चित्र आता दिसत आहे. संपूर्ण देशामध्ये जलसंकटावर मात करण्यासाठी एकच विशिष्ट ‘फॉम्र्युला’ असू शकत नाही. त्यासाठी देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. परंतु सर्वांच लक्ष्य एकच आहे. आणि ते म्हणजे पाणी बचत, जल संरक्षण!!
पंतप्तधान म्हणाले की, पंजाबमध्ये ड्रेनेज लाईन्स सुधारण्याचं काम केलं जात आहे. या कामांमुळे पाणी तुंबण्याची समस्या सुटणार आहे. तेलंगणामधल्या थिमाईपल्ली इथं पाण्याच्या टाक्या तयार करण्यात येत असल्यामुळे गावातल्या लोकांचे आयुष्य बदलत आहे. राजस्थानमध्ये कबीरधाम इथं शेतांमध्ये बनवण्यात आलेल्या लहान लहान तलावांमुळे मोठे परिवर्तन घडून आले आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोर इथं करण्यात आलेल्या सामूहिक प्रयत्नांविषयी मी वाचलं होतं की, तिथं नाग नदी पुनर्जीवित करण्यासाठी 20 हजार महिला एकत्रित आल्या. गढवालमधल्या महिला आपआपसात मिळून एकत्रितपणे ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करीत आहेत, असंही माझ्या वाचनात आलं. अशा प्रकारे अनेक प्रयत्न केले जात आहेत. माझा विश्वास आहे की, ज्यावेळी आपण सगळे एकजूट होवून, मजबूतपणे प्रयत्न करतो, त्यावेळी अशक्य ते शक्य होते. ज्यावेळी प्रत्येकजण या जल संरक्षणाच्या कार्यात सहभागी होईल, त्याचवेळी पाणी वाचणार आहे. आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी देशवासियांकडे तीन गोष्टींचा आग्रह धरणार आहे.
माझा पहिला आग्रह असणार आहे – तो म्हणजे ज्याप्रमाणे देशवासियांनी स्वच्छता मोहिमेला आंदोलनाचं रूप दिलं, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठीही एका जनआंदोलनाला प्रारंभ करावा. आपण सगळे मिळून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करूया. पाणी परमेश्वरानं दिलेला प्रसाद आहे. पाणी परीसाचं रूप आहे. पूर्वी म्हणायचे की, परीसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं बनतं. मी म्हणतो की, पाणी परीस आहे, आणि परीसाच्या म्हणजेच पाण्याच्या स्पर्शानं नवजीवनाची निर्मिती होते. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी एका जागरूकता अभियानाची सुरूवात केली जावी. यामध्ये पाण्याशी संबंधित समस्यांविषयी बोललं जावं, त्याच बरोबर पाणी बचतीच्या पद्धतींचा प्रचार-प्रसार केला जावा. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवी, मान्यवर, व्यक्तींनी पाणी बचतीच्या मोहिमेचे नेतृत्व करावं. प्रसिद्ध, लोकप्रिय व्यक्तींच्या मार्फत जल संरक्षणाविषयी नवीन प्रभावी जाहिरात केली जावी, असा आग्रह मी करतो. चित्रपट क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रसार माध्यमातले आमचे सहकारी असो, कथा-कीर्तनकार असो, प्रत्येकानं आपआपल्या पद्धतीनं या आंदोलनाचं नेतृत्व करावं. समाजाला जागरूक करून, समाजाला जोडण्याचं काम करावं. असा सर्व समाजाचा सहभाग या आंदोलनामध्ये असेल तर तुमच्या डोळ्यादेखत परिवर्तन होईल.
देशवासियांना माझा दुसरा आग्रह पाण्याविषयीचाच आहे. आपल्या देशामध्ये पाणी संरक्षणासाठी अनेक पारंपरिक पद्धतींचा वापर अनेक शतकांपासून केला जातो. आपण सर्वांनी जलसंरक्षणाच्या त्या पारंपरिक पद्धतींची माहिती शेअर करावी, असा आग्रह मी करतो. आपल्यापैकी कोणाला जर पूज्य बापूजींच्या जन्मस्थानी- पोरबंदर इथं जाण्याची संधी मिळाली असेल तर त्यांनी हे स्थान पाहिलं असेल. पूज्य बापूजींच्या घराच्या मागच्या बाजूलाच आणखी एक दुसरे घर आहे. तिथं 200 वर्षांपूर्वीची एक पाण्याची साठवण टाकी आहे. विशेष म्हणजे या टाकीमध्ये आजही पाणी आहे. पडणाऱ्या पावसाचे पाणी या टाकीत रोखण्याची व्यवस्था आहे. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो, जर कोणी कीर्ती मंदिरमध्ये जाणार असेल तर, त्यानं ही पाण्याची साठवण टाकी जरूर पहावी. अशा प्रकारे विविध प्रयोगांनी अनेक ठिकाणी पूर्वापार पाणी साठवण्याच्या जागा असतील. तसेच विविध पद्धतीनं पाणी साठवलं जात असेल. ती माहिती शेअर करावी.
तुम्हा सर्वांना माझा तिसरा आग्रह आहे की, जल संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आपण शेअर करावी. अशी माहिती संकलित झाली तर पाण्यासाठी समर्पित, पाण्यासाठी सक्रिय असलेल्या संघटना, व्यक्ती, यांची सर्व माहिती संकलित होईल. पाण्यासाठी काम करणाऱ्यांचा एक ‘डाटाबेस’ तयार होईल. चला, तर मग; आपण जल संरक्षणाशी संबंधित जास्तीत जास्त पद्धतींची एक सूची बनवून लोकांना जलसंरक्षणासाठी प्रोत्साहन देवू या. आपण सर्वजण ‘‘#जनशक्तीफॉरजलशक्ती’ (#JanshaktiForJalshakti) याचा उपयोग करून आपली माहिती यामध्ये ‘शेअर’ करू शकता.