नवी दिल्ली, 12 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला संबोधन केले. कोरोना विषाणूचा सामना जग गेले चार महिने करीत असून जगभरातील 42 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून पावणेतीन लाख लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारतातही अनेक कुटुंबांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. मात्र त्याच वेळी कोरोनाचे हे मोठे संकट भारतासाठी स्वावलंबनाची मोठी संधी घेऊन आले असल्याचा विश्वास त्यांनी जनतेला दिला.
आत्म निर्भर भारत
कोविड-19 ची पूर्व आणि पश्चात स्थितीचे निरीक्षण करून पंतप्रधानांनी 21 व्या शतकांतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न स्पष्ट केले. कोरोना संकट सुरु झाले तेव्हा भारतात पीपीई अर्थात वैयक्तिक संरक्षण उपकरणांची वानवा होती मात्र आजच्या घडीला भारतात दररोज 2 लाख पीपीई किट आणि 2 लाख एन-95 मास्कची निर्मिती होत आहे असे त्यांनी सांगितले. “वसुधैव कुटुंबकम” ही भारताची संस्कृती असून भारताच्या कामगिरीचा प्रभाव सध्या संपूर्ण जगावर पडत आहे. जगाच्या कल्याणासाठी भारताचे मोठे योगदान आहे. क्षयरोग, कुपोषण, पोलिओ यावर विशेष अभियानाद्वारे भारताने केलेल्या प्रयत्नांचा प्रभाव आज जगावर पडला आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. स्वावलंबी भारतासाठी भारताची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, भौगोलिक स्थिती, मागणी -पुरवठा साखळी ही पंचसूत्री मजबूत करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
आत्मनिर्भर भारताचे पाच सशक्त स्तंभ
कच्छच्या भूकंपाची आठवण देत पंतप्रधान म्हणाले की, भूकंपानंतर कच्छने आत्मनिर्भर बनून स्वतःचे अस्तित्व पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. आज अशाच प्रयत्नांची देशाला आत्मनिर्भर बनण्यासाठी गरज आहे. ते म्हणाले की, स्वावलंबी भारत पाच स्तंभांवर उभा असेल. 1) अर्थव्यवस्था, जी वाढीव बदलाऐवजी छोटा बदल घडवून आणते ;2) पायाभूत सुविधा, जी भारताची ओळख बनली पाहिजे; 3)21 व्या शतकातील तंत्रज्ञानाद्वारे चालविलेल्या व्यवस्थांवर आधारित पद्धत ; 4) व्हायब्रंट डेमोग्राफी, जे एक स्वावलंबी भारतासाठी आपले उर्जा स्त्रोत आहे; आणि 5) मागणी, ज्याद्वारे आमच्या मागणी आणि पुरवठा साखळीची ताकद संपूर्ण क्षमतेसाठी वापरली जावी. मागणी वाढविण्याबरोबरच पुरवठा साखळीतील सर्व भागधारकांना मजबूत करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
आत्मनिर्भर भारत अभियान
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक विकासाची गती मंदावली असल्याने अर्थव्यवस्थेला पुनरावस्थेत आणण्यासाठी पंतप्रधानांनी आज 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. ते म्हणाले की या आर्थिक विशेष पॅकेजची सविस्तर माहिती वित्तमंत्र्यांव्दारे देण्यात येईल. ते म्हणाले की हे विशेष आर्थिक पॅकेज भारताच्या जीडीपीच्या दहा टक्के असून या आर्थिक पॅकेजमुळे देशातील विविध वर्गांचे जीवन मान उंचावणार आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने लँड, लेबर ,लिक्विडिटी आणि लाॅ या चार एलवर जोर दिला असून कुटीर, गृह, लघु-मध्यम उद्योगांना गती दिल्यामुळे करोडो लोकांचे हीत साध्य होणार आहे. त्यांनी मध्यमवर्गाला केंद्रित ठेवून या आर्थिक विकास पॅकेजमध्ये विशेष प्रावधान ठेवले आहे
पंतप्रधान पुढे म्हणाले की, मागील सहा वर्षात केलेल्या सुधारणांचा आज पडताळा येतो आहे. जनधन आधार मोबाइल (जेएम द्वारे) लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंट मध्ये थेट राशीचे हस्तांतरण करण्यात आले त्यामुळे या लाॅकडाऊनच्या काळातही लोकांना आर्थिक मदत पुरवल्या गेली. पंतप्रधान म्हणाले की, भविष्यात जर महामारी सारखा एखादा रोग उद्भवल्यास भारताच्या कृषिक्षेत्राला त्याची झळ बसू नये यासाठी आताच उपाययोजना करणे गरजेचे असून सरकार आर्थिक पॅकेज द्वारे विशेष पावले उचलणार आहे. रॅशनल टॅक्स सिस्टीम म्हणजेच सहज कर प्रणाली. या सुधारणांद्वारे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल आणि उद्योगधंद्यांना सक्षम बनवता येईल. जागतिक पुरवठा साखळी ही आज वेळेची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, करोना-19 महामारीच्या या संकटकाळी स्थानिक उद्योगधंद्यांचे महत्त्व सगळ्यांना पटलं असून स्थानिक निर्माते, स्थानिक पुरवठासाखळीदार ,स्थानिक बाजारपेठ यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे स्थानिक निर्मात्यांना प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी असून स्थानिक ते जागतिक प्रवास आपल्याला गाठायचा आहे यासाठी स्थानिक उत्पादनांचा प्रचार करणे गरजेचे असून त्यामुळे देशाला निर्भर होण्यास मदत होईल यावेळी त्यांनी खादी आणि हँडलूम क्षेत्राचे उदाहरण दिले.
कोविड बरोबरची जीवनशैली
पंतप्रधानांनी नमूद केले की बऱ्याच तज्ञ आणि वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की हा विषाणू दीर्घकाळ आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. परंतु, आपले जीवन केवळ त्याभोवती फिरत नाही-हे सुनिश्चित करणे देखील महत्त्वाचे आहे. मास्क वापरणे तसेच परस्परात दोन हात अंतर ठेवून सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अवलंब करून लोकांनी त्यांच्या लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करावे यासाठी त्यांनी लोकांना अभिप्रेरित केले.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याविषयी बोलताना ते म्हणाले की, त्याचे स्वरूप आजपर्यंतच्या लॉकडाऊन परिस्थितीपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. राज्यांकडून आलेल्या शिफारशींच्या आधारे नवीन नियम तयार केले जातील आणि त्याबाबतची माहिती 18 मे पूर्वी दिली जाईल.