New Delhi : महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, “महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या अपघातातील जीवितहानीमुळे अतिशय व्यथित झालो आहे. शोकाकुल परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात उदभवलेल्या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष दिले जात असून बाधितांना मदत पुरवली जात आहे.”
या दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, “महाराष्ट्रात रायगडमध्ये दरड कोसळून झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसानभरपाई पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून दिली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.














