रत्नागिरी : गरिबी निमूर्लनासाठी व झोपडपट्टी मुक्त शहर साकार होण्यासाठी सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर या संकल्पेनवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देणार असे पालकमंत्री तथा गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये म्हाडाच्या भूखंडावरील विकास व रत्नागिरी जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल योजनांचा आढावा पालकमंत्री वायकर यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, गृहनिर्माण विभागाचे प्रधानसचिव संजिव कुमार, जिल्हाधिकारी प्रदीप पी., पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, म्हाडाचे उपाध्यक्ष सुभाष लाखे, कोकण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लहाने, पोलीस महानिरीक्षक नवल बजाज रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या योजनेमध्ये मुख्य चार घटक असून त्यामध्ये झोपडपट्टी विकास या घटकामध्ये जमिनीचा वापर साधनसंपत्ती म्हणून करुन झोपड्यांचा विकास करणे व खाजगी सहभागाद्वारे विकास करणे. दुसऱ्या घटकामध्ये कर्ज संलग्न व्याज अनुदान असून त्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील जनतेला कर्ज संलग्न व्याज अनुदान देय असणार आहे. ज्यामध्ये सहा लाखांपर्यंत घरकुलासाठी किंवा सदनिकेसाठी ६.५० टक्के अनुदानाचा दर असेल. तिसऱ्या घटकामध्ये भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे असून त्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरीता केंद्र शासन दीड लाख अनुदान देणार असून राज्यशासना मार्फत एक लाख अनुदान असे मिळून एकूण अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच चौथ्या घटकामध्ये लाभार्थ्यांसाठी व्यक्तीगत घरकुल योजनेत अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार असून या घटकातंर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील पात्र कुटूंबाना त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घरकुल बांधण्यास किंवा असलेल्या सदनिकेचा विस्तार करण्यासाठी दीड लाखापर्यंत केंद्राचे व एक लाख राज्य शासन अनुदान देणार आहे असे एकूण अडीच लाख अनुदान उपलब्ध होणार आहे.
सद्यस्थितीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी ४७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज मागविणे व ते बँकांना सादर करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आहे व या सर्वांवर नियंत्रण जिल्हाधिकारी यांचे असेल. या योजनेतंर्गत कोणताही भारतीय नागरिक अर्ज करु शकेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने ज्यांना अद्याप स्वत:चे घर उपलब्ध नाही अशा कुटूंबांनी किंवा व्यक्तींनी नगरपालिकेशी संपर्क साधून या योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी असेही त्यांनी यावेळी जिल्ह्यातील जनतेस आवाहन केले.