मुंबई, 24 जुलै : बकरी ईदनिमित्त राष्ट्र सेवा दल आणि मुस्लिम युवक युवतींनी केलल्या प्लाझ्मा दान आवाहनाची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली. आज सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते निसार अली सय्यद, वैशाली सय्यद, रुबीना खान, उत्कर्ष बोरले, मुबीना शेख, ईशा सय्यद यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आमंत्रित केले होते. उपक्रमाची माहिती घेऊन सर्व प्रकारे मदत करू, अशी ग्वाही दिली.
कोरोनामुक्त झालेल्या मुस्लिम युवक युवतींनी इदुल अज़हा म्हणजे बकरी ईदनिमित्त प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन राष्ट्रसेवा दलासह मुस्लिम कार्यकर्त्यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मुस्लिम युवक-युवती नाव नोंदवत आहेत.
सुप्रिया सुळे यांनाही राष्ट्र सेवा दलाच्या आवाहनाबात समजताच त्यांनी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि उपक्रमाला सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. आपण कोरोना विरोधात तीव्र लढाई लढत आहोत. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.