रत्नागिरी (आरकेजी): राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर प्लास्टिक कचऱ्याच्या विघटनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठाणने प्लास्टिक कचरा विघटनासाठी पुढचं पाऊल टाकले असून टाकाऊ कचराबरोबरच प्लास्टिक, थर्माकोलचं विघटन करून वीट, आदी विविध स्वरूपाच्या वापरायोग्य वस्तू त्यांनी बनविल्या आहेत.
कचरा ही सध्या देशाची मोठी समस्या आहे. समस्या सोडवण्यासाठी व स्वच्छतेकरिता सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र स्वच्छता अभियानला हवे तसे प्रतिसाद मिळत नाही. सरकारबरोबरच नागरिकही याला काही प्रमाणात जबाबदार आहेत. त्यातच प्लास्टिक बंदी जरी झाली असली, तरी कचऱ्यात मात्र प्लास्टिक ढिगानी सापडत आहेत. मग अशा प्लास्टिक कचऱ्याचं करायचं तरी काय? यासाठी दापोलीतल्या निवेदिता प्रतिष्ठानने अनोखा उपक्रम राबवला आहे. प्लास्टिकपासून त्यांनी चक्क विटा बनविल्या आहेत. प्लास्टिकचं विघटन करून त्यामध्ये 20 टक्के सिमेंट, तर 80 प्लास्टिकचं मिश्रण या विटांमध्ये वापरण्यात आलं आहे. या विटा बांधकामासाठीही वावरता येतील असं निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी सांगितले. सध्या प्रायोगिक तत्वावर 100 विटा बनविण्यात आल्या आहेत. गेले चार महिने पावसात या विटांचं परिक्षणही करण्यात आलं. पावसात त्या उत्तम राहिल्याचं निरीक्षणही नोंदविण्यात आलं.
दरम्यान कचऱ्यातील प्लास्टिकपासून विशेषतः बाटल्यापांसून वेगवेगळी शोभेची फुलं, फ्लॉवरपॉट बनविण्यात आले आहेत. तर थर्माकोलपासून गम तयार करण्यात आलं आहे, जे इतर गमप्रमाणेच आहे.
प्लास्टिक कचरा द्या
जनतेने प्लास्टिक कचरा टाकून न देता तो आमच्याकडे द्यावा. प्लास्टिक कचरा संकलनासाठी दापोलीत केंद्रही सुरु करण्यात आलं असून, हे केंद्र दर रविवारी 11 ते 1 या वेळेत सुरु राहील. त्यामुळे निसर्ग रक्षणासाठी हातभार लावावा असं आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.
सरकार उदासीन
राज्यात तेरा कोटी वृक्ष लागवड झाली. या वृक्षांच्या तेरा कोटी पिशव्यांचा होणारा 43 हजार किलो कचरा प्रतिष्ठानकडे द्यावा असं निवेदन प्रतिष्ठान करून सरकारला देण्यात आलं होतं. मात्र सरकारकडून याला काहीच उत्तर मिळालं नाही, त्यामुळे प्लास्टिक बंदी करणाऱ्या सरकारलाच याचं गांभीर्य नसल्याचा आरोप प्रशांत परांजपे यांनी केला आहे.