रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): आजपासून राज्यात प्लास्टिकबंदी सुरु होत आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषद सज्ज झाली असून प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून रत्नागिरी नगर परिषदेकडून प्लास्टिक जप्तची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तसेच एकाच व्यक्तीकडे दुसऱयांदा प्लास्टिक आढळल्यास 500 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
प्लास्टिकच्या दुष्परिणामामुळे राज्य सरकारने अखेर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून आजपासून अंमलबजावणी सुरु होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनहि सज्ज झालं असून जिल्ह्यातील नगर परिषदा देखील आपल्या परीने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. रत्नागिरी नगर परिषदेने यासाठी दोन पथक तयार केले आहेत. शहरात दोन भागात हे पथक प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी फिरणार आहे. दरम्यान उद्या दोन्ही पथकं आठवडा बाजारापासून कारवाईला सुरुवात करणार आहेत. ज्यांच्याकडे प्लास्टिक असेल ते जप्त करण्यात येणार आहे. पहिल्या वेळी कोणतीही कारवाई करण्यात येणार नाहीय, मात्र दुसऱ्या वेळी त्याच व्यक्तीकडे, व्यापाऱ्याकडे प्लास्टिक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 500 ते 10 हजार रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिली आहे.
दरम्यान जनता, व्यापारी तसेच विक्रेत्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण शहरात रिक्षाच्या माध्यमातून ध्वनीक्षेपाद्वारे माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे जनता, विक्रेते, व्यापारी आम्हाला या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावनिसाठी सहकार्य करतील असा विश्वास राहुल पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.
प्लास्टिक विघटनाच्या मशनरी
रत्नागिरी शहरात दररोज 2 ते 3 टन प्लास्टिक कचरा जमा होतो. हि एक मोठी समस्या आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या विघटन करणाऱ्या मशनरी रत्नागिरी शहरात ठिकाठिकानी बसवण्याचं पालिकेने ठरवलं असून, 10 ठिकाणी या मशनरी बसवण्यात येणार असल्याचं नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितलं.