
रत्नागिरी : 33 कोटी वृक्षलागवड अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या वृक्षारोपणाला आज आरे गावातील समुद्रकिनाऱ्यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात झाली. हिरवाईचा हा उत्सव येणाऱ्या महिनाभरात सर्वत्र वृक्ष लावण्यात सर्वांनी खर्ची टाकावा व पर्यावरणाचे आपलं नातं जपण्याच्या दृष्टिकोनातून याला उत्सवी स्वरुपात साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केलं. या सोहळ्याला पोलीस बँड तसेच विविध शाळातील पथके पथनाट्य यांचीही जोड लागली होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा शल्यचिकित्सक श्री. बोल्डे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, विभागीय वन अधिकारी विजयराज सुर्वे, उपजिल्हाधिकारी (रोहयो)सुशांत बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, भारतीय तटरक्षक दलाचे अतुल दांडेकर, अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग विजय दाभाडे, कार्यकारी अभियंता रत्नागिरी पाटंबधारे विभाग जगदिश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले घराच्या जवळ, घराच्या गल्लीमध्ये, गार्डनमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा जिथे जागा असेल तेथे झाडे लावा आणि या मोहिमेत सहभागी व्हा. नुसते झाडे लावून भागणार नाही तर ती जगवणे आणि त्यांचे संर्वधन करणेही गरजेच आहे. यामुळे निसर्गामध्ये संतुलन राखला जाईल आणि आपला उद्याचा काळ सुरक्षित होईल असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपणाचे महत्व विशद करणारी वन है तो जल है आणि जल है तो मनुष्य का कल है अशी कवितेचा मथळाही सांगितला.
चव्हाण म्हणाले, मागील तीन वर्षामध्ये रत्नागिरी जिल्हयाला दिलेले उद्दिष्ट आपण पूर्ण केले आहे. आतापर्यंत 28 लाख झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यातआलेली असून यावर्षी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाड लावू आणि वृक्षरोपणामध्ये रत्नागिरी जिल्हा इतरांसाठी एक आदर्श म्हणून पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी रा.भा.शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचे महत्व विषद करणारे पथनाट्य तर गोदुताई जांभेंकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीत सादर केल. या कार्यक्रमाला मेस्त्री हायस्कूल, ए.के. देसाई हायस्कूल, एम.डी. सिंग हायस्कूल, एम.डी. नाईक हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, जी.जी.पी.एस शाळा, शिर्के हायस्कूल, गोदूताई जांभेकर विद्यालय, पटवर्धन हायस्कूल आणि बसानी हायस्कूल आदि शाळांमधील एन.सी.सी., एम.सी.सी., ग्रीन आर्मी तसेच स्काऊट गाईड मधील सुमारे 350 विद्यार्थी सहभाग घेतला.















