मुंबई : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावण्याच्या, खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा शुभारंभ चेंबूर येथे पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांच्या उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाची नवी आशा जागृत करणाऱ्या ‘प्लांट अ होप’ नावाच्या या वृक्षारोपण मोहिमेत खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने एकूण 4 लाख 24 हजार 913 वृक्षांची लागवड येत्या 5 वर्षांत केली जाणार आहे. या अनोख्या मोहिमेत सर्व नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 4 लाख 24 हजार 913 मतांसह खासदार राहुल शेवाळे पुन्हा एकदा विजयी झाले. आपला हा विजय साजरा करण्यासाठी आणि मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खासदार शेवाळे यांनी, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावण्याचा संकल्प केला. यानुसार बुधवारी सकाळी चेंबूरच्या पंजारापोळ परिसरातील शनी मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुमारे 70 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार तुकाराम काते, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, नगरसेविका वैशाली नवीन शेवाळे, निधी शिंदे, उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभा संघटक निमिष भोसले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढील पाच वर्षांत शिवसेना पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, महाविद्यालये, खासगी कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या माध्यमातून वेळोवेळी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जाणार असून या मोहिमेला यशस्वी केले जाणार आहे.