नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेड इन इंडिया आयकॉन’ सोहळ्यात मराठीतील पहिलेवहिले ओटीटी प्रेक्षकांच्या भेटीला आणून, आपली मराठी संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणारे ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले असून महाराष्ट्र, गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार अक्षय बर्दापूरकर यांना प्रदान करण्यात आला. राज भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा, नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घुगे यांची उपस्थिती होती.
निर्माता, कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेसृष्टी संबंधित इतर विभाग तसेच टेलिव्हिजन, डिजिटल इंडस्ट्रीत अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मेड इन इंडिया आयकॉन’ सोहळ्यात गौरवण्यात येते. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे.
या पुरस्काराविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ”माझ्या कामाची दखल घेऊन, या पुरस्काराने मला गौरवल्याबद्दल नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनचे आभार. त्यांच्या अशा उपक्रमांमुळे सिनेसृष्टी संबंधित प्रत्येकालाच प्रोत्साहन मिळते. हे असे पुरस्कार नक्कीच ऊर्जा वाढवणारे असतात, सोबतच कामाविषयीची आपली जबाबदारीही वाढवणारे असतात. ‘प्लॅनेट मराठी’च्या माध्यमातून मराठी संस्कृतीला लाभलेल्या साहित्याचा समृद्ध वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांना उत्कृष्ट, आशयपूर्ण कंटेन्ट देण्यासोबतच त्यांना मनोरंजनात्मक कार्यक्रम देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आज हा पुरस्कार मी स्वीकारला असला तरी हा पुरस्कार ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीच्या संपूर्ण टीमचा आहे. ही सुरुवात असून अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.”