सिंधुदुर्ग : गणपतीपूर्वी चिपी विमानतळावरून प्रायोगिक तत्वावर विमान सेवा सुरू करण्याचा आपला शब्द आपण पाळला आहे. विमान सेवा सुरू करण्यासाठी चिपी विमानतळ सज्ज झाले असून 12 सप्टेंबर रोजी प्रायोगिक तत्वावर पहिले विमान उतरणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. पालकमंत्री केसरकर यांनी आज चिपी विमानतळाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्यासह स्ट्रीमकास्टचे हर्ष साबळे, आयआरबीचे एविएशन डायरेक्टर किरण कुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मठकर, वेंगुर्ल्याचे तहसिलदार शरद गोसावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, वेंगुर्ल्याचे माजी सभापती दीपक नाईक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
12 डिसेंबर 2018 रोजी पहिले आंतरराष्ट्रीय विमान चिपी येथे येणार असल्याचे सांगून पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, विमानसेवा सुरू करण्यासाठी चिपी विमानतळाची सर्व कामे मार्गी लागली आहेत. विमानतळासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वीज जोडण्या पूर्ण झाल्या असून काही ठिकाणी भूमीगत वीज वाहिन्यांचे काम शिल्लक आहे ते युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. लवकरच चिपीला तिल्लारीचे पाणी आणण्याचे काम सुरू आहे. 12 डिसेंबर रोजी येणाऱ्या विमानातून माल्टा या देशातील काही मंत्रीही कोकणाला भेट देण्यासाठी येणार आहेत. या लोकांच्या राहण्याची सोय स्थानिक लोकांनी उभारलेल्या कॉटेजीसमध्ये करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेच आजचा दौरा आयोजित केला आहे. स्थानिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच निवास आणि न्याहरी योजना राबविण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले. सरकार ही योजना राबवणाऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान देणार असून खाजगी गुंतवणूकदार 50 टक्के गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे 100 टक्के अर्थ सहाय्य तत्वावर ही योजना राबविण्यात येत आहे. ज्यांच्याकडे जुनी चांगली घरे आहेत. त्यांनी या योजनेसाठी पुढे यावे तसेच ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्या जमिनीवर 100टक्के अर्थसहाय्यातून कॉटेज उभारण्यात येणार आहेत. विमानतळासोबतच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा आपला प्रयत्न असून यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. विमानतळाच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणण्याची कल्पना आहे. या विमानतळाच्या उड्डानाविषयी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत यांनी मोलाचे काम केले आहे. त्यांच्या पाठपुराव्यातूनच लवकरच हे विमानतळ सुरू होईल. सध्या या विमानतळाची धावपट्टी अडीच किलोमीटरची आहे. पण, आम्ही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू केल्यानंतर लवकरच ही धावपट्टी सव्वा तीन किलोमीटर लांबीची करण्यात येईल. त्यासाठीचे नियोजन आत्ताच करण्यात आले आहे. जिल्ह्याचा कायापालट करणे हे आपले स्वप्न आहे. यंदाचे वर्ष हे सिंधुदुर्ग वासियांसाठी स्वप्नपुर्तीचे वर्ष असणार आहे. स्थानिकांना या विमानतळावर रोजगार मिळण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहोत. या विमानतळासाठी ज्यांनी जमीन दिली आहे त्यांच्या घरातील किमान एका व्यक्तीला रोजगार मिळेल. त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीस आठवड्यातून तीन दिवस व त्यानंतर दररोज विमान सेवा सुरू होईल, असेही पालकमंत्री यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी भोगवे, कोंडुरा, आरवली येथील पर्यटन स्थळांचीही पाहणी केली. येत्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये चिपी विमानतळ परिसरात चारशे कॉटेज उभारण्यात येणार असल्याची माहिती या पाहणी दरम्यान त्यांनी दिली.