
डोंबिवली : येथील फडके पथावरील अतिधोकादायक इमारत जयराम सदन सहा दिवसांपूर्वी खचली होती. डोंबिवलीतील मार्केट भागात ही इमारत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून इमारत तातडीने तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरूवारी सकाळपासून बंदोबस्तात इमारतीचे तोडकाम सुरु करण्यात आले.
तळ अधिक चार मजले असलेली जयराज सदन इमारत 45 वर्षापूर्वीची असून संपूर्ण इमारतीत वाणिज्य कार्यालये असून तळ मजल्यावर 12 गाळे आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटरने इमारतीच्या दुरुस्तीची शिफारस केली होती. वाणिज्य कार्यालये असल्याने अंतर्गत सजावट करण्यात आली होती त्यामुळे इमारतीचे परिक्षण करण्यात आले नव्हते व जो भाग खराब झाला आहे तो तातडीने पाडून टाकण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता 50 कर्मचारी, हत्यारे, पालिकेचे कर्मचारी यांनी इमारत पाडण्यास सुरवात केली. रामनगर व टिळकनगर पोलीस ठाण्याचे 3 अधिकारी, 15 पोलीस, पालिकेचे 15 पोलीस अशा बंदोबस्तात इमारत पाडण्याचे काम सुरु करण्यात आले. प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप व दिपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु असून संपूर्ण इमारत पाडण्यात सुमारे दहा ते पंधर दिवस लागतील असे सांगण्यात आले.














