
भाजपचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी या संदर्भात माहिती दिली. श्री. फडणवीस 11.30 वाजता बोरज, ता. खेड येथे चक्रीवादळ नुकसानीची पाहणी करतील. तिथून 1.15 वाजता निवळी येथे पाहणी करतील. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव आहे. दुपारी 2.30 जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहेत. सायंकाळी 4.15 वाजता मच्छीमार व आंबा बागायतदारांसमवेत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत भेट घेणार आहेत. त्यानंतर परकार हॉस्पीटलला भेट देणार आहेत. सायंकाळी ते मोटारीने ओरस (जि. सिंधुदुर्ग) येथे रवाना होणार आहेत.
गतवर्षी निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतरही फडणवीस यांनी तातडीने दौरा करत शेतकर्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांना नुकसानभरपाई मिळण्याकरिता राज्य शासनाकडे मागणीही केली होती. सलग दुसर्या वर्षी आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकरी, बागायतदार व सर्वसामान्य माणूस कोलमडून पडला आहे. शिवाय कोरोना महामारीची दुसरी लाटही जोरदार असल्याने त्यांना आधार देण्याकरिता फडणवीस येणार आहेत.
या दौर्यात श्री. फडणवीस यांच्यासह विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार नीलेश राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण तसेच उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन हेसुद्धा दौर्यात सहभागी होणार आहेत.
श्री. फडणवीस यांच्या हस्ते ऑक्सीजन बँकेचे लोकार्पण होणार आहे. तसेच भाजपा आणि आमदार प्रसाद लाड यांनी सीएसआरमधून मदत उपलब्ध करून दिलेल्या परकार हॉस्पिटलला फडणवीस भेट देतील, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.