
रत्नागिरी, (आरकेजी) : पेट्रोलपंप चालकांचे १४ मे पासून होणारे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. हे आंदोलन झाल्यास सरकारने मेस्मा लावण्याच्या निर्णय घेतल्यानेच त्याला स्थगिती देण्यात आली आहे. सरकार करत असलेल्या दडपशाहीचा पेट्रोल पंप चालकांनी निषेध केला आहे.
तेल कंपन्यांनी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारच्या अपुर्वाचंद्रा कमिटीच्या निर्देशा नुसार पंप चालविण्याच्या खर्चाचा परतावा १ जानेवारी २०१७ पासून देण्याबाबतचा लेखी करार तेल कंपन्यांनी सीआयपीडी या देशपातळीवरील संघटनेशी केला होता.
करारातील अटींनुसार ठरलेल्या मुदतीत तीन महिने होऊनही तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडुन सदर कराराची अंमलबजावणी होत नसल्याने फामपेडा या राज्य संघटनेच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील सर्व पंपचालकांनी १० मे रोजी खरेदी बंद आंदोलन केले होते.
आंदोलनाच्या दिवशी संघटनेने तेल कंपन्यांना बैठक बोलविण्याची विनंती केली होती. परंतु त्यास तेल कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दि १४ मे पासून प्रत्येक रविवारी महाराष्ट्रातील सर्व पंपचालक सीएनजीसह सामुहीक सुट्टी घेणार होते, तसेच १५ मे पासून महाराष्ट्रातील सर्व पंपचालक सीएनजीसह सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत फक्त सिंगल शिफ्टमध्ये काम करणार होते. आंदोलन केल्यास सरकार कारवाई करण्याच्या तयारीत होते. स्वत:ची कोणतीही बाजू डिलर्सला मांडू न देता सरकारकडून डिलर्सला आदेश प्राप्त झाले होते. त्यामुळे हे आंदोलन आम्ही पुढे ढकलत आहोत. या बाबत ऑइल कंपन्यांनी आम्हाला चर्चेसाठी १७ मे रोजी मुंबईत बोलावले आहे, असे उदय लोध यांनी सांगितले.